कल्याणमध्ये आदिशक्तीचा जागर
सिटी पार्कमध्ये महिलादिनाचा जल्लोष
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : जुन्या व नव्याची सांगड घालत महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेनुसार शनिवारी (ता. ८) सायंकाळी महिलादिनाचा कार्यक्रम कल्याण पश्चिम येथील सिटी पार्कच्या निसर्गरम्य वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला. या वेळी तरुणाईची तुडुंब गर्दी झाली होती. या कार्यक्रमात महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील वसंत व्हॅली येथील कर्मचारी वर्गाने झुंबा व योगाचे फ्युजन नृत्य सादर केले. तर खडेगोळवली येथील वैद्यकीय विभागाच्या कर्मचारीवर्गाने स्त्री जीवनातील विविध टप्प्यांचे नृत्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अखेरीस गोंधळाच्या माध्यमातून आदिशक्तीचा जागर करण्यात आला. या वेळी पीयूष अकॅडमी आणि कल्याण मम्मीज ग्रुप यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण केले.
महिलादिनाच्या या कार्यक्रमात प्रथमच आई आणि मुलीच्या नात्याचे सौंदर्य, प्रेम आणि भावनेला अनोखी अभिव्यक्ती देण्यासाठी आई आणि लेक अशा रॅम्प वॉकचे आयोजन केले होते. परंतु या रॅम्प वॉकमध्ये आई, तिची लेक इतकेच नव्हे तर ७२ वर्षांच्या आजीबाईंनीदेखील आपल्या नातीसमवेत रॅम्प वॉक करून प्रेक्षकांना आदिम स्त्रीशक्तीचे मनोहारी दर्शन घडविले. या रॅम्प वॉकमध्ये सहभागी महिलांबरोबरच महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी, महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी व इतर महिला अधिकाऱ्यांनीदेखील सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपल्या छोट्या लेकीसह आणि सुविद्य सासूबाईंसह रॅम्प वॉक करीत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कल्याण आयएमएच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा इटकर आणि प्रख्यात गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. अश्विन कक्कर यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्वदेखील समजावून सांगितले. महिलांसाठी या वेळी रँडम शुगर, बोन डेन्सिटी हिमोग्लोबिन आदी चाचण्या नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सायंकाळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलावर्गाने प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
तरुणाईचा गराडा
कार्यक्रमस्थळी नि:शुल्क उपलब्ध असलेल्या नेल आर्ट आणि मेहंदीच्या स्टॉल्सभोवती तरुणाईचा गराडा दिसून येत होता. कल्याण डोंबिवली महापालिका व सिटी पार्क मॅनेजमेंटचे विजय इंगळे यांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना शेटे यांनी आणि रॅम्प वॉकचे नियोजन डॉ. अर्चना सोमाणी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.