कर्जतला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्याची मागणी
कर्जत, ता. १० (बातमीदार) ः पनवेल–कर्जत उपनगरी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत स्थानकाला ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्जत रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्याची घोषणा केली आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत भरत भगत यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
हुतात्मा हिराजी पाटील हे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे योद्धा होते. सिद्धगड लढाईत त्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली होती. देश पारतंत्र्यात असताना कर्जत तालुक्यात आणि त्यातही माथेरान-नेरळ परिसरात ब्रिटिशांविरोधात मोठी चळवळ उभी राहिली. आझाद दस्ता हा त्यापैकीच एक होता. स्वातंत्र्यासाठी आग्रही असणाऱ्या तरुणांची फळी उभारण्यात भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची मोठी कामगिरी आहे. हिराजी पाटील यांच्या शौर्याच्या स्मृती जपण्यासाठी कर्जत स्थानकाचे नामकरण त्यांच्या नावाने करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या मागणीसाठी केंद्र, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवण्यात आले आहे, याशिवाय नामकरणाच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. जर या मागणीवर लवकर कार्यवाही झाली नाही, तर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा सुधाकर घारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. स्थानिक नागरिक आणि युवावर्गानेही या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. या पत्रकार परिषदेत वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्जत रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याची ठाम मागणी करण्यात आली. इतिहासाच्या योग्य जतनासाठी आणि वीर पुरुषांचा आदर्श उंचावण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे मान्यवरांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.