उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : रंगोत्सवाचा जल्लोष साजरा करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि पर्यावरण विभागाने शहरवासीयांना यंदाची होळी आणि धूलिवंदन (रंगपंचमी) पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेअंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार देशभरातील नागरिकांना पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जलसंधारण, वृक्षसंवर्धन; तसेच प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि उपआयुक्त (पर्यावरण) विशाखा मोटघरे यांनी नागरिकांना तसे आवाहनही केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आपण परंपरा आणि संस्कृतीचे पालन करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे आपण सर्वजण पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन केले.
‘निसर्गस्नेही’ रंगपंचमी
जनजागृती मोहिमेला शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रदूषणविरहित उत्सव साजरा करून एक जबाबदार नागरिक असल्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपण सर्वांनीच आपल्या पुढील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हरित पर्यावरणाचा वारसा जपायला हवा. यासाठीच यंदाची होळी आणि रंगपंचमी ‘निसर्गस्नेही’ करण्याचा संकल्प करुया!
पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सण-उत्सवांचे महत्त्व कायम राखत, त्यांचा आनंद घेताना निसर्गाच्या संतुलनाची काळजी घेणे आवश्यक आहे. यंदाची होळी आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यासाठी महापालिका नागरिकांसोबत आहे. वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि प्रदूषण टाळून जबाबदारीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन करत आहोत.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
‘हे’ कटाक्षाने टाळा
* वृक्षतोड नको - होळी पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात, त्यामुळे कृत्रिम पर्यायांचा अवलंब करावा.
* पाण्याचा अपव्यय रोखा - रंगपंचमीच्या दिवशी हजारो लिटर पाणी वाया जाते. त्या ऐवजी कोरड्या रंगांची किंवा फुलांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांची निवड करावी.
* ध्वनिप्रदूषण टाळा - मोठ्या आवाजातील डीजे आणि ध्वनिक्षेपकामुळे वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होतो.
* रासायनिक रंगांचा वापर करू नका - हे रंग त्वचेसाठी हानिकारक असतात आणि पाण्याचे प्रदूषण वाढवतात.
* कर्णकर्कश आवाज आणि असभ्य वर्तन टाळा - गोंधळ घालणे, अर्वाच्च भाषा वापरणे, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे यामुळे सामाजिक वातावरण बिघडते.
* प्लास्टिक फुगे आणि पिशव्यांचा वापर बंद करा - प्लास्टिकचा कचरा वाढवणाऱ्या वस्तूंची विक्री आणि वापर दोन्ही टाळावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.