कंत्राटी ५८० सफाई कामगार कायम
सर्वोच्च न्यायालयाचे पालिकेला निर्देश; कचरा वाहतूक श्रमिक संघाचा यशस्वी लढा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः पालिकेत गेल्या २८ वर्षांपासून काम करणाऱ्या ५८० कंत्राटी सफाई कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कायम सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पालिकेची याचिका रद्द करत कामगारांना पालिकेच्या सेवेमध्ये साल १९९८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा आदेश कायम केला आहे.
न्यायालयीन लढाईत पुन्हा एकदा कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या लढाईला यश आले आहे. या निर्णयानंतर सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालिकेत १९९६-९७ साली ५८० सफाई कामगारांना सेवेत कंत्राटी पद्धतीवर रुजू केले. कंत्राटदारांकडून या कामगारांची वर्षानुवर्षे पिळवणूक करण्यात आली. याविरोधात आवाज उठवत कचरा वाहतूक श्रमिक संघाने कामगारांना पालिकेच्या कायम सेवेत सामावून घेण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू ठेवला. कामगारांना श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली यासाठी संघर्ष करावा लागला. या कालावधीत सुमारे ७० कामगारांचा मृत्यू झाला, तर सुमारे ५६ कामगार वयोपरत्वे निवृत्त झाल्याची माहिती श्रमिक संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव, सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी दिली.
१९९९ ते २००४ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात केस चालली, त्यानंतर २००५ मध्ये न्यायालयाने मुंबईच्या औद्योगिक प्राधिकरणाकडे हे प्रकरण निर्णयासाठी पाठवले. २०२५ ते २०२१ असा प्रदीर्घ काळ प्राधिकरणात केस चालली. यात कामगारांचा मुद्दा ग्राह्य धरत २४० दिवसांपेक्षा अधिक काम केलेल्या कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले होते.
कामावर कायमचे रुजू करण्यात यावे, यासाठी हे कंत्राटी सफाई कामगार गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने लढा देत आहेत. २०१६ आणि २०१७ मध्ये दोन निर्णय कामगारांच्या बाजूने लागूनही पालिकेने एक वर्षाहून अधिक काळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता या प्रकरणाकडे जाणूनबुजून कानाडोळा केला. मुंबई महापालिका न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही म्हणून औद्योगिक न्यायालयामध्ये कामगारांनी दाद मागितली. तिथेही सफाई कामगारांच्या बाजूने निकाल लागला. महापालिकेने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने पालिकेची याचिका रद्द केली आणि ५८० कामगारांना १९९८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने पालिकेच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा आदेश कायम केला आहे.
आतापर्यंत चार हजार ५२० कामगार रुजू
गेली २८ वर्षे कंत्राटी सफाई कामगारांसाठी सातत्याने लढणाऱ्या
कचरा वाहतूक श्रमिक संघाने २००६ मध्ये एक हजार २४०, २०१७ मध्ये दोन हजार ७०० आणि आता ५८० असे एकूण चार हजार ५२० कंत्राटी सफाई कामगारांना मुंबई महापालिकेने कायम सेवेत घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.