अर्थसंकल्पात एसटीला आश्वासनाच्या अक्षता!
थकीत वेतन, नवीन बस खरेदीचा प्रश्न कायम; महामंडळाला अपेक्षित निधीच नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) यंदाच्या अर्थसंकल्पातून मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा होती. थकीत वेतन, नवीन बस खरेदी, इंधन खर्च आणि अन्य थकबाकी यामुळे महामंडळ अडचणीत असताना अर्थसंकल्पात त्यावर ठोस उपाय नसल्याने एसटीच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.
सरकारने नवीन बस खरेदी आणि काही योजनांसाठी निधी जाहीर केला असला, तरी त्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे एसटीची झोळी पुन्हा रिकामीच राहिली आहे, अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या पाच हजार नव्या बसेस सामील करण्याची घोषणा केली होती, मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या निधीबाबत कोणतीही स्पष्टता नाही. तसेच महामंडळाच्या एकूण सहा कोटी रुपयांच्या थकीत देणी भागवण्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सीएनजी आणि एलएनजीवर आधारित बसेससाठी प्रोत्साहन देण्याचा उल्लेख केला असला तरी ही योजना नवी नसून, केवळ जुन्याच योजनांना नव्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे यामधून फार काही साध्य होण्याची शक्यता नाही, असे बरगे यांनी सांगितले.
महामंडळाचे प्रश्न कायमच!
एसटीच्या पुनरुज्जीवनासाठी वेगळी आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र थकीत वेतन आणि सेवा-सुविधांसाठी कोणतीही भरीव तरतूद न केल्याने महामंडळाच्या अडचणी वाढणार आहेत. हा अर्थसंकल्प एसटीला दिलासा देणारा नाही.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
थकीत देणींचा बोजा वाढताच
एसटीच्या एकूण थकीत देण्या सात हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत.
गेल्या वर्षीची तूट : ९९३.७६ कोटी रुपये
वेतनवाढ फरक (२०२०-२०२४) : २,३१८ कोटी रुपये
थकीत महागाई भत्ता : १५० कोटी रुपये
थकीत भविष्य निर्वाह निधी (पीएफ) : १,१०० कोटी रुपये
थकीत ग्रॅच्युइटी (उपदान) : १,१५० कोटी रुपये
एसटी बँक थकीत रक्कम : १५० कोटी रुपये
एलआयसी थकीत रक्कम : १० कोटी रुपये
रजा रोखीकरण थकीत रक्कम : ६० कोटी रुपये
वैद्यकीय प्रतिपूर्ती थकीत रक्कम : १० कोटी रुपये
डिझेल थकीत रक्कम : १०० कोटी रुपये
भांडार देणी थकीत रक्कम : ८० कोटी रुपये
पुरवठादार कंपन्यांचे थकीत देयक : ५० कोटी रुपये
अपघात सहाय्यता निधी थकीत रक्कम : ३ कोटी रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.