सोनाराच्या डोळ्यात धूळ फेकून अंगठी लंपास
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : ग्राहकाच्या रूपात आलेल्या चोरट्याने आपल्या हातातील नकली अंगठी ठेवून सोनाराच्या डोळ्यात धूळ फेकत खरी सोन्याची अंगठी लंपास केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
उल्हासनगरमधील पंजाबी कॉलनी, आझाद नगर रस्त्यावर असलेल्या पौर्णिमा ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात हा प्रकार घडला. गणेश खडके यांच्या ज्वेलर्समध्ये सोमवारी (ता. १०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्याच्या लहान मुलीसह आली. बायकोसाठी अंगठी पाहायची आहे, अशी विनंती करीत त्याने दुकानात विविध अंगठ्या दाखवण्यास सांगितले. गणेश खडके यांनी त्यांच्या कलेक्शनमधील अनेक सोन्याच्या अंगठ्या त्याच्यासमोर मांडल्या. तो बारीक निरीक्षण करीत असल्याचा बहाणा करीत ग्राहकासारखा वागत होता; मात्र या संधीचा फायदा घेत त्याने अत्यंत चतुराईने आपल्या हातातील नकली अंगठी ठेवली अन् अस्सल सोन्याची अंगठी गुपचूप लंपास केली.
व्यवहार आटोपल्यानंतर गणेश खडके यांनी दागिन्यांची तपासणी केली असता, एक अंगठी कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. चोरीस गेलेली अंगठी सुमारे २.५ ग्रॅम वजनाची असून, तिची बाजारात अंदाजे किंमत १९ हजार रुपये आहे. दुकान मालकाने तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.