एसटीने २३ कोटी ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास
दररोज ३७२ लाखांचा खर्च; महामंडळाच्या आकडेवारीतून उघड
मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १४ : महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख एवढी असली तरीही अमृत योजनेंतर्गत मागील अकरा महिन्यांत तब्बल २३ कोटी ८२ लाख ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास केला आहे. या कालावधीत सवलतीमुळे एक हजार २४३ कोटी ५६ लाखांचा परतावा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) देणे लागते आहे. दररोज ज्येष्ठांच्या प्रवासावर ३७२ लाख रुपये खर्च होत असल्याचे महामंडळाने सरकारला सादर केलेल्या अंतर्गत आकडेवारीतून हे तथ्य उघड झाले आहे. एकूण लोकसंख्येत अंदाजे १० टक्के लोकसंख्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची ही संख्या तोंडात बोटे घालायला लावणारी असून वृद्धांनो घरीच बसा, असे सांगण्याची वेळ महामंडळावर आली आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत ३३४ दिवसांत २३ कोटी ८२ लाख ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास केला आहे. २०२३-२४ या वर्षात २२ कोटी ५२ लाख वृद्धांनी, तर ७५ वर्षांवरील वृद्धांसाठी २०२२-२०२३ मध्ये मोफत प्रवासाची घोषणा होताच २१८ दिवसांत सात कोटी ८३ लाख जणांनी एसटीने प्रवास केला होता. २०२२ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ५४ कोटी १७ लाख वृद्धांनी एसटीच्या सवलत योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे दोन हजार ७९९ कोटी ३२ लाख रुपये एसटी महामंडळाला शासनाकडून येणे अपेक्षित असल्याची नोंद करण्यात आली आहे. १७ मार्च २०२३ रोजी महिलांना ५० टक्के सवलत जाहीर झाल्यानंतर एसटीचा तीन हजार ४११ कोटींचा महसूल बुडाला. महिलांच्या तिकिटांच्या माध्यमातून तीन हजार ४५७ कोटींचा महसूल जमा झाला आहे; मात्र अमृत योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमुळे मंडळाचे नुकसान होत आहे. घरच्या कटकटींना कंटाळून किंवा राहून गेलेली फिरायची हौस पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बाहेर पडत असावेत का, असा प्रश्न मंडळाला पडत आहे. आश्चर्य वाटण्यासारख्या या आकडेवारी एसटी प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनली आहे.
----
महामंडळाच्या नाकीनऊ
ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत पर्यटनावरील आर्थिक भार उचलताना एसटी महामंडळाच्या नाकीनऊ येत आहेत. या खर्चावर तोडगा काढण्यासाठी वृद्धांना घरीच थांबा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एक ज्येष्ठ नागरिक व्यक्ती वर्षातून कितीदा प्रवास करते, प्रवासाचे मार्ग कोणते, याची पाहणी करणे हेच केवळ महामंडळाच्या हाती आहे, असे एसटी महामंडळाचे अधिकारी हताशपणे सांगत आहेत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.