सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ ः रात्रंदिवस भेडसावणारी वाहतूक कोंडी, पाण्याची बोंब आणि आता नव्याने उद्भवलेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे नवीन ठाणे आणि उच्चभ्रूंची वस्ती म्हणून उदयास आलेला घोडबंदर परिसर सध्या तिहेरी संकटात सापडला आहे. कोट्यवधींच्या घरात राहणाऱ्या येथील रहिवाशांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याने रहिवाशांना पालिका आयुक्तांना साकडे घालण्याची वेळ आली आहे.
घोडबंदर रोडवरील नागरिकांना ठिकठिकाणी साचलेला कचरा, तीव्र पाणीटंचाई आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या तिहेरी कोंडीमुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. आठवडाभरापासून या भागातील विविध सोसायट्यांच्या बाहेर व वर्दळीच्या रस्त्यांलगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यापूर्वी दिवाळीदरम्यानही अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे दर सहा महिन्यांनी उद्भवणाऱ्या कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याच अनुषंगाने भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासोबत घोडबंदर रहिवाशांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून, विविध अडचणींचा पाढा वाचला आहे.
---------------------------------------------
आश्वासनांचे फक्त कागदी घोडे
गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर रोडवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर आदींच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. दरवेळी आश्वासने देऊन कागदी घोडे नाचविले जाते. एका बैठकीत ५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी दरमहा चार ते पाच हजारांचा खर्च करावा लागत असल्याकडे लक्ष वेधताना आश्वासनांपलीकडे काही मिळाले नसल्याची खंत रहिवासी व्यक्त करत आहेत.
-------------------------------------
सर्वाधिक महसूल देऊनही दुर्लक्षित
घोडबंदर रोडवरील रहिवासी सोसायट्या व आस्थापनांच्या माध्यमातून महापालिकेला सर्वाधिक मालमत्ता कर उपलब्ध होतो, तर बिल्डरांकडून दाखल केल्या जाणाऱ्या विकास प्रस्तावांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कामुळे महापालिकेची तिजोरी मोठ्या प्रमाणावर भरली जाते, मात्र महापालिकेला महसूल देणाऱ्या प्रामाणिक करदात्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याची घोडबंदरवासीयांची भावना झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.