सिडकोच्या महागड्या घरांविरोधात सोडतधारकांचा एल्गार
मनसेच्या नेतृत्वाखाली वाशीत भव्य मानवी साखळी आंदोलन
वाशी, ता. २५ (वार्ताहर) : सिडकोने ऑक्टोबर २०२४मध्ये नवी मुंबई परिसरात जाहीर केलेल्या २६ हजार घरांसाठी अव्वाच्या सव्वा किमती लावल्यामुळे सोडतधारक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या सोडतधारकांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत मंगळवारी (ता. २५) वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नरपर्यंत भव्य मानवी साखळीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो सिडको सोडतधारकांनी सहभाग घेतला होता.
सिडकोने द्रोणागिरी, तळोजा, वाशी, उलवे आदी नोडमध्ये सोडत काढलेल्या घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्याचे आश्वासन देऊनही सिडकोने घरांच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जाहिरातीत ३२२ चौ. फुटांचे घर सांगून प्रत्यक्षात २९० चौ. फुटांचे घर देण्यात आले, असा फसवणुकीचा आरोपही आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने सप्टेंबर २०२४मध्ये पंतप्रधान आवास योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची उत्पन्न मर्यादा तीन लाखांपेक्षा कमी, तर अल्प उत्पन्न गटाची मर्यादा तीन ते सहा लाख असायला हवी. सिडको मात्र या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी सिडको अध्यक्षांनी घरांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. कुर्ला येथे म्हाडा ५०० चौ. फुटांचे घर ५० लाखांना देत असताना, सिडको नवी मुंबईत ३०० चौ. फुटांचे घर ८० लाखांना का देत आहे, असा सवालही मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.