‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवा आता ‘ऑटो डीसीआर’ प्रणालीमध्ये
वार्षिक चार लाख ३८ हजार टन राडारोडावर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी ऑनलाइन सेवादेखील कार्यान्वित आहे. या सेवेचा महापालिकेने आता विस्तार केला आहे. मोठ्या विकास प्रकल्पांमधील राडारोडादेखील संकलित होऊन त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया व्हावी, यासाठी ‘ऑटोडीसीआर’ या प्रणालीमध्ये ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. वार्षिक चार लाख ३८ हजार टन राडारोडावर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.
मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा संकलित करणे, वाहून नेणे व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाच्या माध्यमातून दहिसर आणि शिळफाटा या दोन ठिकाणी राडारोडा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयनिहाय ही सेवा उपलब्ध आहे. ही सेवा अधिक लोकाभिमुख, जलद होण्यासाठी कार्यक्षम व्यवस्था उभी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते.
‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी पालिकेने मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४ आणि पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत उपलब्ध करून दिले. तसेच मायबीएमसी मोबाइल ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन पर्याय कार्यान्वित केले आहेत. राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यंत ऑनलाइन प्रणालीद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने ही सेवा अल्पावधीत नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
राज्यातील सर्वात मोठा प्रक्रिया प्रकल्प
मुंबई शहर (कुलाबा ते शीव) व पूर्व उपनगरांसाठी (कुर्ला ते मुलुंड) मेसर्स मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) मेसर्स एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प दहिसर येथे आहे. कोकणीपाडा येथील पाच एकर प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रतिदिन इतकी आहे. म्हणजेच दोन्ही कंत्राटदारांची एकत्रित सेवा लक्षात घेता, प्रतिदिन एक हजार २०० टन डेब्रिजवर प्रक्रिया होणार आहे. प्रतिदिन एक हजार २०० टन प्रक्रिया ही क्षमता लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा राडारोडा प्रक्रिया प्रकल्प आहे.
राडारोडा उचलण्याचे दर निश्चित
शहर व पूर्व उपनगरांसाठी प्रतिटन एक हजार ४२५ रुपये असा दर लागू असेल. तर पश्चिम उपनगरांसाठी प्रतिटन एक हजार ४१५ रुपये असा दर आहे. संबंधित प्रकल्प, विकसक यांनी स्वतः राडारोडा वाहून प्रक्रिया केंद्रावर आणल्यास अशा प्रकरणांमध्ये शहर व पूर्व उपनगरांसाठी प्रतिटन ७१५ रुपये, पश्चिम उपनगरांसाठी प्रतिटन ७१० रुपये हा दर लागू असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.