गुलाबराव पाटील यांना नेशन बिल्डर अवॉर्ड
कल्याण (वार्ताहर) : विविध क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी या देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार केले, तर त्यांचा देशासाठी चांगला उपयोग होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ कल्याण यांच्यातर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाते. नुकताच कल्याण येथे सार्वजनिक वाचनालयाच्या रोटरी सभागृहात हा सोहळा पार पडला. गुलाबराव पाटील हे मागील पंचवीस वर्षांपासून सम्राट अशोक विद्यालयात मुख्याध्यापकपदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक विकासाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत अष्टपैलू विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहेत. कोरोना काळातही पाटील यांनी शिक्षकांकडून आर्थिक मदत घेत दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. पाटील यांना २०१८ला राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. बी. के. बिर्ला नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. बिपीन वाडेकर, उद्योगपती मिलिंद कुलकर्णी, रोटरीचे अध्यक्ष पराग कापसे, सेक्रेटरी आत्माराम घाणेकर यांच्या हस्ते पाटील यांना नेशन बिल्डर अवॉर्ड देण्यात आला.
..................
मालमत्ता सील करण्याच्या कारवाईचा बडगा
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली मनपा प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकीपोटी थकीत मालमत्ता करप्रकरणी मालमत्ता सील करण्याच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. कल्याण (पश्चिम) क प्रभाग क्षेत्रातील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्तांना वारंवार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्याने महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, परिमंडळ १चे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यासमवेत क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात व अधीक्षक बजरंग बजागे यांच्या पथकाने पाच लाख ८२ हजार ०४२ रुपयांची मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई नुकतीच केली. यामध्ये कल्याण (पश्चिम) रामबाग येथील पवन बार सील करण्यात आला. त्याचप्रमाणे कल्याण (पश्चिम) येथील राजा हॉटेल यांची थकबाकीची रक्कम वसूल करण्यात आली.
.................
एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण
कल्याण (वार्ताहर) : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्याने सेव्ह पेंढारकर मोहिमेअंतर्गत एमआयडीसी कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १) बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती सेव्ह पेंढारकर महाविद्यालय मोहिमेचे संयोजक सोनू सुरवसे यांनी दिली. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनधिकृत बांधकामाबाबत सेव्ह पेंढारकर मोहिमेच्या वतीने एमआयडीसी विभागाला वारंवार विनंतीपत्र लिहिली होती. तसेच प्रत्यक्ष कार्यालयास भेटी देऊन या प्रश्नाबाबत चर्चा केली होती. त्या अनुषंगाने के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु एमआयडीसीने त्या महाविद्यालयावर कोणतीही कारवाई केली नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप सुरवसे यांनी केला आहे.
.....................................
भंगार वाहनांवर जप्तीची कारवाई
कल्याण ( वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, पादचाऱ्यांना रस्त्यावरील रहदारीतून ये-जा करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी डोंबिवली पूर्व येथील ९० फीट रोड परिसरातील रस्त्यांवर अनेक दिवसांपासून उभी असलेली तीन रिक्षा, छोटा टेम्पो अशी एकूण चार बेवारस वाहने जप्त करून करून खंबाळपाडा येथील वाहनतळावर जमा केली. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने आणि एक हायड्रा, एक डम्परच्या सहाय्याने करण्यात आली.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.