वसई, ता. ३० (बातमीदार) : चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यानिमित्त पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पालखी मिरवणुकीसह शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रांमध्ये सामाजिक व पर्यावरणावर आधारित संदेश देण्यात आले. ढोल-ताशा, ध्वजपथक, लेझीमपथक आणि टाळ-मृदंगाच्या गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सोसायट्यांनी आपल्या परिसरात रांगोळ्या काढल्या होत्या. फेटे घालून तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच शोभायात्रेत सहभागी झाले होते. महिलांनीदेखील मराठमोळी नऊवारी परिधान करून शोभायात्रेत सहभाग घेतला.
लेझीम, बँड, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, पुणेरी टोपी असा पेहराव करत नागरिकांनी नववर्षाचे जोरदार स्वागत केले. चैत्रोत्सवाला देवदर्शन घेण्यासाठीदेखील मंदिरांत रीघ लागली होती, तर शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीला उधाण आले होते. नववर्षानिमित्ताने पारंपरिक वेशभूषा, संस्कृती, परंपरेचे दर्शन घडले होते.
गुढीपाडव्यानिमित्त पालघर जिल्ह्यात नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यंदाही नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यासाठी शनिवारी रात्रीपासूनच शहराच्या चौकाचौकातील रस्त्यांवर, अंगणात रांगोळीची आरास करण्यात आली होती. रविवारी अगदी पहाटेपासूनच शहराच्या विविध भागांतून नववर्ष स्वागत यात्रांना सुरुवात झाली. विविध ठिकाणी सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले आनंदाने सहभागी झाली हाेती. कुणी छत्रपती शिवाजी महाराज, तर कुणी वासुदेव, मावळ्यांचा पेहराव केला होता. रथ, घोडे आणि पायी चालत जाणारे विविध वेशभूषेतील नागरिक पाहिल्यावर पेशवाई, शिवरायांच्या काळातील अनुभूती पालघरनगरीला येत होती.
समाजमाध्यमांवर शुभेच्छांची बरसात
मित्रमंडळी, दूर असलेले नातेवाईक व कार्यालयीन सहकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाजमाध्यम निवडले. समूहात, तसेच वैयक्तिक शुभेच्छांची बरसात झाली होती, त्यामुळे भावनिक नातेदेखील घट्ट झाले.
देवींच्या मंदिरात गर्दी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दर्शनासाठी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. डहाणूतील महालक्ष्मी, विरारमधील जीवदानी माता, केळवे येथील शितलादेवी, नायगाव येथील चंडिका देवी, निर्मळ परिसरातील शंकर मंदिर यासह जिल्ह्यातील विविध मंदिरांत नववर्षाच्या सुरुवातीला दर्शनासाठी भाविकांचा कल असल्याचे दिसून आले.
सामाजिक संस्थांचा पुढाकार
प्रचंड उकाडा वाढला असला, तरी नागरिक शोभायात्रेत माेठ्या संख्येने सहभागी झाले होते. काेणालाही उन्हाचा फटका बसू नये, यासाठी ठिकठिकाणी काही सामाजिक संस्थांकडून दूध आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भरउन्हात घामाच्या थारांनी भिजलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.