श्रीवर्धन-अलिबाग गाडी कायमस्वरूपी बंद
आर्थिक उत्पन्न कमी झाल्याचे महामंडळाकडून सबब
श्रीवर्धन, ता. १० (वार्ताहर) ः प्रशासकीय कार्यालयांचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे श्रीवर्धन आगाराकडून गेली ३८ वर्षे श्रीवर्धन-अलिबाग ही नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणारी गाडी आर्थिक उत्पन्न अत्यल्प असल्याचे कारण देत एसटी महामंडळाकडून कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी ही श्रीवर्धन-अलिबाग गाडीबाबतीत तोट्यातील गाडी सुरू होणार नाही, असे स्पष्टीकरण दिल्याने आता ही गाडी इतिहासजमा झाली आहे.
श्रीवर्धन आगाराची स्थापना झाल्यापासून श्रीवर्धन- वडखळ- अलिबाग गाडी सुरू करण्यात आली होती. कोविड काळात राज्य परिवहन महामंडळाने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात काही गाडीसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यावर शासनाच्या परिपत्रकानुसार श्रीवर्धन आगारातून लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील गाड्या सुरू करण्यात आल्या. अपवाद होता श्रीवर्धन- अलिबाग या गाडीचा. प्रवासीवर्गाच्या आग्रहामुळे ही गाडी सुरू करण्यात आली; परंतु कमी प्रवासी संख्या असल्याचे कारण देत फक्त एका आठवड्यातच अलिबाग गाडी बंद करण्यात आली. प्रवासीवर्गाच्या पाठपुराव्यामुळे श्रीवर्धन- अलिबाग गाडी मुरूड व रेवदंडामार्गे सुरू केली; मात्र या मार्गावरही प्रवासी मिळत नसल्याचे कारण पुढे करून गाडी बंद करण्यात आली.
.........................
श्रीवर्धन येथून सकाळी साडेपाच व अलिबाग येथून सायंकाळी सहा वाजता मार्गस्थ होत असलेल्या गाडीतून शासकीय कर्मचारी, शासकीय कामानिमित्ताने अलिबाग येथे जाणारे नागरिक यांच्याकरिता उपयुक्त ठरत होती. म्हसळा, माणगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणे, वडखळ येथील प्रवाशांना ही गाडी लाभदायक होती. अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी अशी ओळख असणाऱ्या गाडीचे अचानक आर्थिक उत्पन्न कसे घटले, असा सवाल केला जात आहे.
===================================================================================================
प्रतिक्रिया :
अलिबाग गाडीसाठी आजही आम्ही आग्रही आहोत. कामानिमित्त अलिबागला जायचे म्हणजे मुरूडमार्गे किंवा श्रीवर्धन येथून माणगाव व पुढे गाड्या बदलत जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना असा प्रवास त्रासदायक होतो. आर्थिक उत्पन्न कमी हे आम्हाला पटत नाही.
- हरिदास वाघे, श्रीवर्धन, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.