माणगाव ४१ नेत्ररुग्णांची तपासणी
माणगाव (बातमीदार) ः आरोग्य शिबिराअंतर्गत बुधवारी (ता. ९) ४१ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल व माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा यांच्या बाजूला असणाऱ्या महेंद्र पितांबर मेथा यांच्या प्रशस्त हॉलमध्ये हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४१ रुग्णांची तपासणी केली. यातील १५ नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हे शिबिर दर महिन्याच्या एका बुधवारी आयोजित करण्यात येते.
..................
धुळे जिल्ह्यातील शिक्षकाचा मानपत्र प्रदान करून गौरव
शबरी सेवा समितीचा पुढाकार; आदिवासी विद्यार्थ्यासाठी विशेष कार्य
कर्जत, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील शबरी सेवा समिती, कशेळे आश्रमशाळेमध्ये रामनवमीचा उत्सव यावर्षी एका वेगळ्याच दिमाखात आणि सामाजिक जाणिवेच्या अनुकरणीय भावनेने साजरा करण्यात आला. केवळ धार्मिक कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता या उत्सवाला समाजसेवेचा वेगळा आयाम देत, या वेळी शैक्षणिक क्षेत्रात अपार कष्ट करून आदिवासी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याची वाट दाखवणारे संतोष सोनवणे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आंबे या लहानशा गावातील रहिवासी असलेले संतोष सोनवणे यांना शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचा मानस होता, मात्र घरच्या आर्थिक अडचणींमुळे पदवीधर होणे शक्य न झालेल्या सोनवणे यांनी छोट्या किराणा दुकानातून उदरनिर्वाह करत शिक्षणाची मशाल पेटवत, गावातच खासगी क्लासेस सुरू केले. पैसा कमावण्यापेक्षा आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले. या ध्यासातून आंबे, सांगवी आणि बोराडे या ठिकाणी त्यांच्या शिक्षण कार्याचा विस्तार झाला आहे. गेल्या काही वर्षांत या कार्यातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. सध्या हे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत आहेत.
......................
संस्थेचे कार्य
शबरी सेवा समिती ही संस्था सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवते. २००३ पासून कर्जत भागात कार्य सुरू केलेल्या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या वतीने सुरुवातीला कुपोषण निर्मूलन, आदिवासी विद्यार्थी शैक्षिणक उपक्रम, शेतकरी सहाय्य, असे उपक्रम राबविण्यात आले होते. आजही संस्थेकडून विविध उपक्रमांवर कामे करण्यात येतात. संस्थेच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्या अंतर्गत महाराष्ट्रभरातील तळागाळात काम करणाऱ्या शिक्षकांना शोधून त्यांचा गौरव केला जात आहे.
...........
स्वातंत्र्यसेनानींच्या स्मारकाचे नूतनीकरण करा
माझं पेण संघटनेची स्थानिक प्रशासनाकडे मागणी
पेण, ता. ९ (वार्ताहर) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, त्या स्वातंत्र्यसेनानींच्या स्मारकाचे नूतनीकरण करावे. तसेच तहसील कार्यालयातील अधिकृत स्वातंत्र्यसेनानींची नावे स्तंभावर स्थापित करून त्यांना सन्मान द्यावा, अशी मागणी माझं पेण संघटनेच्या वतीने पेण तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली. यात स्वातंत्र्य सेनानींचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे त्यांचे ऋण आपल्याला फेडणे कदापिही शक्य होणार नाही. पेण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या समोर असलेल्या या स्मारकाची अक्षरशः दुरवस्था झालेली असून, येथे अनेक फेरीवाले, हातगाडीवाले यांनी बस्तान मांडले आहे. हे स्मारक नवीन ऊर्जा देणारे असून, तहसील कार्यालयाच्या नोंदीनुसार या ठिकाणी सुमारे २५ स्वातंत्र्यसेनानींची नावे स्तंभावर स्थापित करून येथील संपूर्ण परिसराचे नूतनीकरण करावे, अशी मागणी माझं पेण संघटनेच्या वतीने तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी आणि पेण पोलिस यांना निवेदन देऊन केली आहे. या वेळी संघटनेचे राजू पाटील, आर. सी. म्हात्रे, आप्पा सत्वे, गणेश तांडेल, अभी म्हात्रे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.