मुंबई

९० दिवसांचीच पावसाळी मासेमारीबंदी!

CD

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : समुद्रातील मासळीच्या साठ्यात मुबलक वाढ होण्यासाठी मासेमारीबंदीचा कालावधी ९० दिवसांचा व्हावा, यासाठी मच्छीमार पुन्हा एकदा आग्रही झाले आहेत. या कालावधीवाढीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छीमारांनी नुकतीच गुजरातच्या मत्स्योद्योग मंत्र्यांची भेट घेतली. आता मच्छीमार राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांची भेट घेणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा कालावधी राज्यात १ जून ते ३१ जुलै असा ६० दिवसांचा करण्यात आला आहे. हा कालावधी १५ मे ते १५ ऑगस्ट असा ९० दिवसांचा असावा, यासाठी मच्छीमार आग्रह धरत आहेत; परंतु त्यांच्या मागणीबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याने मच्छीमारांनी गेल्यावर्षी स्वत:हून मासेमारी बंदीचा कालावधी १५ दिवस वाढवून घेतला होता. गेल्यावर्षी उत्तन, वसई आणि पालघरमधील मच्छीमारांच्या संघटना एकत्र येऊन त्यांनी मासेमारीची सुरुवात १ ऑगस्टपासून न करता १५ ऑगस्टपासून करण्याचा निर्णय स्वत:हून घेतला होता. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन समुद्रातील मासळीच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने मासेमारी बंदीचा कालावधी ९० दिवसांचा करावा, यासाठी मच्छीमार यावर्षी पुन्हा प्रयत्न करणार आहेत.

अनियंत्रित, अनियमित, तसेच अशाश्वत मासेमारीमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासळी साठ्यात मोठ्या संख्येत घसरण होऊ लागली आहे. पावसाळ्यातील ९० दिवसांचा कालावधी हा मत्स्यबीजवाढीसाठी अत्यंत पोषक मानला जातो. या कालावधीत माशांची पूर्ण वाढ होऊन समुद्रातील मत्स्यसाठाही मुबलक होतो. या पार्श्वभूमीवर मासळीसाठ्यात वाढ होण्याकरिता इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने ८ एप्रिलला गुजरातचे मत्स्योद्योग मंत्री राघवजीभाई पटेल यांची भेट घेतली. यानंतर या विषयाला अधिक चालना मिळण्याकरिता मच्छीमार आता मंत्री राणे यांची पुढील आठवड्यात भेट घेणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष व इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक देवेंद्र तांडेल यांनी दिली आहे.

गुजरात राज्यात झालेल्या बैठकीत मच्छीमारांच्या शिष्टमंडळात महाराष्ट्रातून देवेंद्र दामोदर तांडेल, विनोद गंगाधर पाटील, दीपेश विश्वनाथ पाघधरे, गुजरात राज्यातून गुजरात खारवा समाजाचे अध्यक्ष पावनभाई शियार, किशोरभाई कुवराई, कन्हैयालाल सोलंकी, मुकेशभाई पांजरी, वासूभाई टंडेल आदी मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.

गुजरातकडून सकारात्मक प्रस्ताव
गुजरात राज्य पारंपरिक आणि शाश्वत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या बाजूने आहे. त्यामुळे राघवजीभाई पटेल यांनी तातडीने सचिव पातळीवर बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाला पावसाळी मासेमारी बंदी कालावधी ९० दिवसांचा करण्यासाठी गुजरातकडून प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे आश्वासन पटेल यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

५८ मासळी प्रजाती धोक्यात
केंद्रीय मत्स्यकी संशोधन केंद्राच्या २०१८च्या अहवालानुसार, एकूण ५८ मासळी प्रजाती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामध्ये घोळ, पापलेट, कोळंबी, शिवंड, चिंबोरे, हलवा, माकुल, टायनी, कापशी, गोईनार, फटफटी, मुशी, कट बांगडा, पाखट, टेली बांगडा, फलई, तारली, मांदेली, बांगडा, सुरमई, तूवार, टूना, टोक, पोपट, हेकरू, चार बोंबील, धुमा, लेप आणि शिंगाडा यांच्या प्रजाती अनियंत्रित मासेमारीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

अन्य देशांतील स्थिती
अरबी समुद्रातील सौदी अरेबियाने पाच महिने, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि बहारिन देशांनी चार महिने, तर मादागास्कर आणि मोझांबिक देशांनी प्रत्येकी तीन महिने बंदी लादल्यामुळे तेथील मच्छीमारांना त्यांच्या सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासळी साठा मिळतो. भारताची पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीचे सामुद्रिक क्षेत्र भिन्न असल्याने जे नियम पूर्व किनारपट्टीतील राज्यांना लागू आहेत, तेच पश्चिम किनारपट्टीला लागू करणे योग्य नाही, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambanli Ghat: आंबेनळी घाटात अपघातांना ब्रेक! अँटी-क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा भिंतींसह आधुनिक सुरक्षायंत्रणा उभारण्यास सुरुवात, बांधकाममंत्र्यांची माहीती

IPO: अवघ्या 2 दिवसांत 44 पट सबस्क्राइब! ज्वेलरी कंपनीच्या IPO ची बाजारात धूम; GMP तब्बल 36%; मोठ्या कमाईची संधी?

सोलापूर शहरातील ‘या’ ५ पोलिस ठाण्यास मिळणार नवे प्रभारी! तिघांना पदोन्नती, दोघांचा कार्यकाळ पूर्ण; ‘या’ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, कोणाला मिळणार संधी

Maharashtra Rain Update : पावसाची दमदार सलामी; मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Water Scarcity : पुरंदर-बारामतीची चिंता वाढली; ‘नाझरे’ची भिस्त मृत साठ्यावर

SCROLL FOR NEXT