रिक्षात पाच तर दुचाकीवर चार
कल्याण-डोंबिवलीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : कल्याण-डोंबिवली शहरातील रिक्षाचालक, वाहनचालकांना शिस्त लावण्यात आरटीओ आणि वाहतूक पोलिस अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. रिक्षातून चार-पाच तर दुचाकीवरून तीन ते चार प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र सर्रास शहरात दिसत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकारी यांच्यासमोरच हे प्रकार घडत आहेत. बुधवारी कारवाईसाठी डोंबिवलीत आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना रिक्षाचालकांनी घेराव घालत काही मिनिटांसाठी वाहतूक अडवल्याची घटना घडली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत वाहतूक पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे म्हटले जात आहे.
डोंबिवलीत बुधवारी (ता. ९) कारवाईसाठी आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना रिक्षाचालकांनी घेराव घालत त्यांच्या गाड्या अडवल्याची घटना घडली. आरटीओ अधिकाऱ्यांनी काही रिक्षाचालकांवर कारवाई केल्याने हे रिक्षाचालक संतप्त झाले होते. वाहतूक अधिकारी सरसकट रिक्षांवर कारवाई करीत आहेत, आमचा धंदाही होत नाही तेवढी दंडाची रक्कम आमच्या रिक्षावर बसली आहे, अशी तक्रार या वेळी रिक्षाचालकांनी केली. यानंतर आरटीओ अधिकारी तेथून निघून गेले असले तरी या प्रकारात रिक्षाचालकांची मनमानीदेखील दिसून आली.
कल्याण-डोंबिवली शहरात वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. प्रवासी वाहतुकीची योग्य सुविधा नसल्याने येथील प्रवासी हा वाहतुकीसाठी रिक्षांचा वापर अधिक करतो. रिक्षांचे जाळे शहरात वाढत आहे; मात्र रिक्षाचालकांची मनमानी काही कमी होताना दिसत नाही. तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. वाहनचालकांना वाहतूक नियमांविषयी शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिस, आरटीओकडून वारंवार दंडात्मक कारवाई होत असते; मात्र या कारवाईचा कोणताही सकारात्मक परिणाम पाहायला मिळत नाही.
आजही रिक्षाचालक, दुचाकीस्वारांकडून नियमांचे उल्लंघन करून वाहतूक होत आहे. शहरातील रिक्षाचालक चार प्रवाशांची सर्रास वाहतूक करीत आहेत. अनेक थांब्यावर पाच प्रवासी घेतले जात आहेत. पाच प्रवासी घेतल्याशिवाय या रिक्षा चालूच होत नाहीत. रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारदेखील वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. दुचाकीवर तीन ते चार प्रवाशांचे हमखास प्रवास होतानाचे चित्र शहरात दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकारी यांच्यासमोरच होतात.
ऑनलाइन पद्धतीने कारवाई
ऑनलाइन पद्धतीने दंडात्मक कारवाई होत असल्याने प्रशासन अशा रिक्षाचालकांचा फोटो काढून नंतर त्यांना दंड केल्याचे सांगतात; परंतु कल्याण-शिळ रोडवरील परिस्थिती पाहता वाहतूक अधिकाऱ्याने आपल्या रिक्षाचा फोटो काढताच रिक्षाचालक थोडे पुढे जाऊन रिक्षा थांबवतात. हे वाहतूक पोलिस नेहमीचेच ओळखीचे असल्याने तडजोड करतात, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.