शताब्दी समितीच्या अध्यक्षपदी सीताराम कुंटे
कल्याण, ता. १५ (बातमीदार) : कल्याण गायन समाजाचे शताब्दी वर्ष जुलै २०२५ मध्ये सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने शताब्दी समितीची पहिली सभा सोमवारी (ता. १४) कल्याण गायन समाजाच्या सभागृहात पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी (निवृत्त) व माजी मुंबई महापालिका आयुक्त तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष म्हणून डोंबिवलीमधील ज्येष्ठ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते तसेच टाटा टेली सर्व्हिसेस लिमिटेडचे कायदेशीर सल्लागार माधवराव जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल हेदेखील सभेला उपस्थित होते. त्यांनी महापालिकेतर्फे शक्य ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. चिटणीस म्हणून प्रशांत दांडेकर, मोहित ताम्हनकर व निखिल बुधकर यांची तर खजिनदार म्हणून डॉ. मंदार परांजपे व राहुल रोडे यांची नियुक्ती करण्यात आली. सभेस समाजाचे कार्यकारिणी सदस्य, देवगंधर्व महोत्सवाचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष, शिक्षकवर्ग, तसेच अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
१० जुलै रोजी छोट्याशा धार्मिक अनुष्ठानाने शताब्दी वर्षाला सुरुवात होईल. या सभेत वर्षभर संगीत विषयाच्या कार्यशाळा, प्रात्यक्षिकासह गायन वादन, स्पर्धा, मासिक जलसे आयोजित करण्याचे ठरले. तसेच शताब्दी वर्षातील देवगंधर्व महोत्सवदेखील असाच दिमाखदार पद्धतीने साजरा करायचे ठरले. कल्याण आणि डोंबिवली परिसरातील सर्व नागरिकांच्या दृष्टीने या सांगीतिक संस्थेचे शताब्दी वर्ष साजरे होणे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. सर्व नागरिकांनी या सांगीतिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.