हलगर्जी केल्यास कठोर कारवाई
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रस्तेकामाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग आला आहे; मात्र रस्तेकामात हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारांवर पालिकेने कारवाई करून आतापर्यंत ३.५ कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. यापुढे कामात हलगर्जी केल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
मुंबईत सध्या ठिकठिकाणी डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्याची कामे वेगात सुरू आहेत. या रस्ते कामांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. १५) केली. यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, माजी नगरसेवक अमेय घोले यांच्यासह रस्तेविभागाचे प्रमुख अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रथम बॉम्बे रुग्णालयासमोरील, त्यानंतर काळबादेवी येथील हनुमान मंदिराजवळील, दादर पारसी कॉलनी आणि पुढे बीकेसी परिसरातील रस्तेकामांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी ७०० किमी लांबीचे सिमेंट रस्ते बांधण्याचे काम हाती घेतले. त्यापैकी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांची कामे सुरू असून, ती कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ही कामे दर्जेदार होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आयआयटी मार्फत रस्ते कामांवर देखरेख ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लॅबमध्ये सिमेंट काँक्रिट मटेरियलची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
----
रस्त्यांवर खड्डे पडणार नाही!
सिमेंटचे रस्ते बांधल्यावर त्यावर कोणत्याही कामासाठी खोदकाम करावे लागू नये, यासाठी युटिलिटी डक्टची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी पदपथ, मॅनहोल, चेंबरची स्वच्छता केली जात आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडू नयेत, यासाठी मास्टिक, इन्फ्रारेड, जिओपॉलिमर तंत्रज्ञान यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदा रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत, असा दावा शिंदे यांनी केला.
----
ग्रीन कॉरीडॉर बनवा
दादर येथील पारसी कॉलनी येथील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रस्त्यांची कामे करताना जुन्या व दुर्मिळ झाडांची काळजी घ्यावी. सदर कॉलनीत अधिकतर झाडे लावून ग्रीन कॉरिडॉर बनविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.