मुंबई

किनारपट्टी भागांत सुरक्षेत वाढ

CD

अलिबाग, ता. १० (वार्ताहर)ः भारत-पाक सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मॉक ड्रिल करण्यात आल्या आहेत. अचानक होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्वरित व प्रभावी कारवाई कशी करावी, याचे प्रशिक्षण पोलिस दलास देण्यात आले आहे. सागरी सुरक्षाही अधिक कडक करण्यात आली आहे. किनारपट्टी भागात नाकाबंदी पॉइंट्स उभारण्यात आले असून लॅण्डिंग पॉइंट्स, बेटे व सागरी गावे यांची नियमित पाहणी सुरू आहे. मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अनोळखी बोट किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील धर्मस्थळांवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः महत्त्वाच्या इमारती, सरकारी कार्यालये व गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच समाजमाध्यमांवरही प्रशासनाचे विशेष लक्ष असून, भारत-पाक तणावासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणाऱ्या किंवा द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आपत्कालीन नियंत्रण केंद्र २४x७ कार्यरत
युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन नियंत्रण केंद्र (ईओसी) २४x७ कार्यरत ठेवावेत, असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्‍यानुसार प्रभावी अंमलबजावणी करण्याचे लेखी आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संदेश शिर्के यांनी दिले आहेत. सर्व विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र (ईओसी) २४ तास कार्यरत ठेवावेत. कक्षात पोलिस, प्रशिक्षित होमगार्डची नियुक्ती करावी. आवश्यकता असल्यास एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक, आपदा मित्र यांची नेमणूक करावी व त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व सैन्यदलांशी समन्वय ठेवावा, त्‍यांच्याशी दररोज संवाद साधावा.

रेशन, औषधसाठ्याबाबत सूचना
जिल्ह्यांमध्ये रेशन आणि औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा. अधिकृत समाजमाध्यमांद्वारे आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि अफवांना प्रतिबंध करावा. नागरिकांना अधिकृत माहितीबाबत माध्यमांबद्दल जागरूक करावे. कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

-------------------

कर्जतमध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’
कर्जत, ता. १० (बातमीदार)ः भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण असताना जिल्ह्यातील सागरी भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. सागरी सुरक्षेसाठी अनेक ठोस पावले उचलण्यात आली असून, रायगड पोलिस दल सतर्क आणि सज्ज असल्याचे अपर अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी कर्जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शिवथरे म्‍हणाले, की सागरी सुरक्षेसाठी खास यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक सागरी पोलिस ठाण्यावर आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे. सरकारी तसेच खासगी बोटींतून गस्‍त घालण्यात येत असून तटरक्षक दलाच्या चौकींवर २४ तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘ऑपरेशन ऑल आऊट’ या विशेष मोहिमेंतर्गत शुक्रवारी (ता. ९) रात्री १२ ते सकाळी पाच या वेळेत सगळ्या प्रभारी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्‍यानुसार अवघ्‍या २५ मिनिटांच्या आत सर्व अधिकारी रस्त्यावर उतरले होते.
रायगडमधील २१ प्रमुख स्थळांवर मॉक ड्रिल घेण्यात येत असून यामध्ये पर्यटनस्थळे व आयकॉनिक ठिकाणांचाही समावेश आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये संभाव्य जोखमींचे मूल्यांकन करण्यात येत आहे.
रायगड पोलिस दलाची ही युद्धजन्य तयारी आणि तांत्रिक सज्जता नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलासा देणारी आहे.
.................

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेकापचा मेळावा रद्द
अलिबाग, ता. १० वार्ताहर) ः शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवारी (ता. ११) पेझारी येथे आयोजित करण्यात आला होता; मात्र सध्या भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आणि देशातील सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी बैठक घेऊन जिल्हा चिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय घेण्यात आल्‍याची माहिती जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (ता. १०) पीएनपी महाविद्यालयाच्या प्रांगणात पाच हजार मुला-मुलींना सायकल व शैक्षणिक साहित्‍याचे वाटप करण्यात येणार होते; मात्र देशात युद्धजन्य परिस्थिती असल्‍याने सैन्यदलाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी कार्यक्रम थाटामाटात साजरा न करता सायकल व दप्तर घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजारात नुकसान होतंय? सुरक्षित परताव्यासाठी 'या' 6 योजनांमध्ये करा गुंतवणूक

ऑस्ट्रेलियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटरचं निधन, निवृत्तीनंतर १० वर्षांनी केलेलं पुनरागमन

Latest Maharashtra News Updates : दादर परिसरात जन्माष्टमी उत्सवादरम्यान महिलांनी दहीहंडी फोडली

CM Nitish Kumar : '5 वर्षात एक कोटी तरुणांना देणार सरकारी नोकऱ्या'; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

iPhone 16 Pro Discount : आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 16 Pro मिळतोय 1 लाखाच्या आत, 'इतक्या' हजारांचा बंपर डिस्काउंट

SCROLL FOR NEXT