मुंबई

ठाणे प्रशासकीय यंत्रणा सतर्क

CD

ठाणे प्रशासकीय यंत्रणा सतर्क
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : भारत-पाक सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे शहरासह सर्व प्रमुख शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून युद्धजन्य परिस्थितीचा सामना कसा करायचा, याची प्रात्यक्षिके सुरू आहेत; मात्र ही सर्व यंत्रणा राबवताना नागरिकांनी भयभीत होऊ नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट केले आहेत. त्यामुळे भारत-पाक सीमेवर प्रचंड तणाव वाढला असून कधीही युद्धाचे ‘सायरन’ वाजण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण देशामध्ये संबंधित यंत्रणेकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. ठाणे जिल्ह्यातही त्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून खबरदारी घेतली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, महत्त्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉक ड्रिल आयोजित करून कोणत्याही अप्रिय घटनेचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.


समाजमाध्यमांवर लक्ष
समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांनी संयुक्तपणे जिल्ह्यातील नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

सामाजिक संस्थांचे जाळे उभारणार
युद्धजन्य परिस्थिती आणि पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि इतर संसाधनांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि महानगरपालिका क्षेत्रातील संस्थांनी महापालिकेचे उपायुक्त (मुख्यालय) यांच्याकडे पुढील तीन दिवसांत पोहोचती करावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

माजी सैनिकांच्या अनुभवाचा वापर
जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि कोणत्याही आवश्यक परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांचे मोठे नेटवर्क, प्रशिक्षण संस्थांकडील कुशल मनुष्यबळ आणि माजी सैनिकांचा अनुभव व शिस्त यांचा एकत्रितपणे उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सादर करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील प्रत्येक सामाजिक संस्थेने त्यांच्या संस्थेतील सक्रिय सदस्यांची संख्या, त्यांच्याकडे असलेल्या विशेष कौशल्यांची माहिती उदाहरणार्थ प्रथमोपचार, शोध व बचावकार्य, समुपदेशन, संस्थेकडील आवश्यक उपकरणे उदाहरणार्थ वाहने, वैद्यकीय साहित्य, संपर्क यंत्रणा आणि संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सादर करणे अपेक्षित आहे. माजी सैनिक असोसिएशनने त्यांच्या सदस्यांची संख्या, त्यांच्यातील विशेष कौशल्ये उदाहरणार्थ आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा अनुभव, नेतृत्व क्षमता, त्यांच्याकडे असलेली संसाधने आणि प्रमुख सदस्यांचे संपर्क क्रमांक तहसील कार्यालयात किंवा महापालिका मुख्यालयात जमा करायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Bike Accident : मोटरसायकलच्या अपघातात देशमुख विद्यालयाचे लिपिक जागीच ठार; २ जण गंभीर जखमी

Jintur News : कुंभारी गावच्या सरपंच पार्वतीबाई हरकळ यांचा देशाच्या राजधानीचत सन्मान

Sachin Tendulkar: 'आभ्यासच करत नाही!' जेव्हा सचिनने सुरेश रैनाला स्वत:चा मुलगा म्हणत केलेली एअर हॉस्टेससोबत मस्करी

SCROLL FOR NEXT