इच्छुकांना पक्षप्रवेशाची धास्ती
शिंदे सेनेत धाकधूक वाढली; पालिका निवडणुकीत तिकीट कापण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : शिवसेना शिंदे गटाने कळव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक आपल्या गोटात घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे राजकीय सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे; मात्र त्याचा सर्वाधिक धसका खुद्द शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांनी घेतला आहे. आयारामांना आगामी ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकीट कन्फर्म करूनच घेण्यात आले आहे; मात्र निवडणुकीत रिंगणात शिवसेनेचे जे शिलेदार उतरले होते, त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा संधी मिळेल, अशी आशा होती. त्यामुळे या पक्षप्रवेशाच्या धडाक्यामुळे शिंदे गटातील इच्छुकांनी धसका घेतला असून, आपल्या उमेदवारीवर फुली पडण्याची भीती सतावत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत, तर दुसरीकडे भाजपनेही स्वबळाचा नारा दिल्याने या दोन्ही पक्षात सध्या पक्षप्रवेशाची स्पर्धा सुरू झाली आहे. सध्या शिवसेनेच्या मूळ ६७ पैकी ६४ माजी नगरसेवकांची कुमक शिवसेना शिंदे गटाकडे आहे. ही ताकद ठाणे शहरात असली तरी नौपाडा आणि घोडबंदर पट्ट्यात भाजपने आपले पाय घट्ट रोवले आहे. त्यामुळे शिंदे गटाने ऑपरेशन कळवा राबवले आहे. पहिल्या टप्प्यात येथील सात, तर दुसऱ्या टप्प्यात चार माजी नगरसेवकांना शिवसेना शिंदे गटाने पक्षात घेतले आहे. या सर्व माजी नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे नेत्यांनी वचन दिले आहे, पण त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत पक्षाचे काम करणाऱ्या माजींसह इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
२०१७ झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला ६७ जागा मिळाल्या होत्या. स्पष्ट बहुमतामुळे पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आली होती, पण त्याचवेळी उपशहर असलेल्या कळव्यात शिवसेनेला अपेक्षित यश आले नव्हते. कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ चे पूर्ण पॅनेल राष्ट्रवादीने जिंकले. उर्वरित दोन पॅनेलमध्ये शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले. डझनभर उमेदवार राष्ट्रवादी, काँग्रेससमोर उभे करूनही कळवा, मुंब्रा हातातून गेला. यात माजी उपमहापौर राजन साप्ते यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीने कळव्यात मुसंडी मारल्याने पालिका निवडणुकीत तो क्रमांक दोनचा पक्ष बनला. त्यापैकी शिवससेनेचे राजन साप्ते यांचे स्वीकृत नगरसेवकपदी पुनर्वसन झाले, पण इतर उमेदवार मात्र पुढच्या निवडणुकीत पुन्हा संधी मिळेल, या आशेवर होते.
शिवसेनेत दोन गट पडल्यावर अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला साथ दिली. गेल्या आठ वर्षांपासून ही मंडळी आपल्या आघाडीवर पक्षाचे काम करत आहेत. त्यासाठी वेळप्रसंगी पदरचे पैसेही खर्च करत आहेत, पण आता महापालिका निवडणूक दृष्टिपथात असताना पक्षप्रवेशाच्या सोहळ्यामुळे या इच्छुकांच्या भवितव्यासमोर अंधार पसरल्याची चर्चा आहे. अनेकांनी आपली ही खंत दैनिक सकाळशी बोलून दाखवली. नाव न छापण्याच्या अटीवर या दुखावलेल्या शिलेदारांनी आता आम्ही सतरंजीच उचलणार का, की गेल्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात लढलो त्यांचा प्रचार करणार, असा सवाल उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यावर अन्याय करणार नाहीत, असा विश्वासही काहींनी व्यक्त केला, पण सधी न मिळाल्यास योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचेही सूतोवाच केले आहे.
कल्याण लोकसभेचा गट मजबूत
राष्ट्रवादी शरद पवार गटातील ३४ पैकी सुमारे १५ माजी नगरसेवकांच्या हाती भगवा देण्यात शिंदे गटाला यश आले आहे. त्यामुळे ठाण्यात शिंदे गटाची ताकद वाढली असून, सुमारे ८५ हून अधिक माजी नगरसेवकांची कुमक त्यांच्या गाठीला आजच्या घडीला आहे. ही ताकद आगामी काळात आणखी वाढवण्याची रणनीती आखण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा ‘रामबाण’ कामाला लागला आहे. या खेळीचा पालिका निवडणुकीत फायदा होणार आहे, पण त्यासोबतच मिशन कळवामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाला मजबुती मिळणार आहे. २०२४ झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात कळवा-मुंब्रातून सर्वात कमी मते मिळाली होती. त्यामुळे आगामी काळातील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच हा परिसर यानिमित्ताने बांधण्यात आल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.