रोह्यात जनआक्रोश मोर्चा
अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेचा निषेध
रोहा, ता. १३ (बातमीदार) ः तालुक्यात तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माणगाव न्यायालयात ८ मे रोजी निकाल दिला असून, सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ रोह्यातील नागरिकांनी मंगळवारी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला. मोर्चात शहर व ग्रामीण भागातील महिलांची संख्या लक्षणीय होती. उपस्थित महिलांनी आरोपींचा कठोर शिक्षा घ्यावी आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीचे पत्र प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना दिले. मोर्चात सर्व मराठा समाजासह विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जून २०२० मध्ये तांबडी येथील शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा खटला माणगावच्या जलदगती न्यायालयात चालवण्यात आला होता. सरकारतर्फे तक्रारदाराची बाजू मांडण्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. माणगाव न्यायालयाने घटनेतील सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या निर्णयामुळे रोहेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महिलांच्या उपस्थितीत रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील तपासासाठी सक्षम यंत्रणेची नव्याने नियुक्ती करून चौकशी करावी, पीडितेला न्याय मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात यावा. त्यादृष्टीने सबळ पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटी व अन्य विशेष सक्षम यंत्रणा स्थापन करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रशासन म्हणून पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या पुढे आपल्याकडून याचिका करण्यात येईल. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात खटला चालवण्यात येईल तसेच आपण दिलेल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकारी यांच्याद्वारे सरकारपर्यंत पोहोचवण्यात येईल.
- ज्ञानेश्वर खुटवड, प्रांत अधिकारी, रोहा
रोहा ः न्यायालयाच्या निकालाचा निषेध करीत संतप्त रोहेकरांनी मोर्चा काढून घोषणाबाजी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.