श्रीवर्धन येथे तिरंगा यात्रा उत्साहात
श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) ः भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावर जोरदार कारवाई केली. त्यामुळे भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ श्रीवर्धन येथे शुक्रवारी (ता. २३) दुपारी ४ वाजता तिरंगा यात्रा काढण्यात आली. श्रीवर्धन बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीवर्धन शहर व श्रीवर्धन तालुक्याच्या वतीने भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी व सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र दलाचा गौरव करण्यासाठी निघालेल्या यात्रेत नागरिकांनी हाती तिरंगा ध्वज घेत यात्रेच्या मार्गावर सिंदूर के सन्मान मे, सेना है मैदान मे, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तिरंगा यात्रेत श्रीवर्धन तालुक्यातील माजी सैनिक व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा यात्रा आल्यावर संतोष दिवेकर, दिलीप पडवळ, दत्तात्रय मोरे या माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. या यात्रादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.