कासा, ता. २४ (बातमीदार) : डहाणू, जव्हार आणि मोखाडा तालुक्याला शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः हादरवून सोडले. विजेच्या कडकडाटासह झालेल्या संततधार पावसात अनेक झाडे उन्मळून पडली, तर घरांचे पत्रे उडाले आणि महत्त्वाच्या ३३ केव्ही क्षमतेच्या विजेच्या वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे संपूर्ण भाग अंधारात गेला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
संतोषी परिसरात वीजवाहिनीवर कोसळलेल्या झाडामुळे पुरवठा बंद करण्यात आला. दिवशी-दाभाडी भागातही घरांवरील पत्रे उडाले. झाडे आडवी पडल्याने रस्ते आणि वाहतूक ठप्प झाली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत झाडे हटवण्याचे काम केले, तरी संपूर्ण भाग अंधारातच राहिला. काही ठिकाणी उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असला, तरी बहुतेक गावांत शनिवारीही (ता. २४) अंधार कायम आहे.
वीज नसल्यामुळे घरगुती कामकाजाबरोबरच सीएनजी पंप, पेट्रोलपंप, लघुउद्योग आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मोबाईल चार्जपासून ते थेट थंड पाणी, साठवलेले अन्न, औषधे यांच्यावर परिणाम झाला आहे.
दरवर्षीचे ‘पूर्वदृश्य’, पण उपाय नाहीतच!
पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी, दुरुस्तीची कामे महावितरणमार्फत केली जातात, असा दावा होतो, मात्र प्रत्यक्षात हे उपाय केवळ कागदावरच राहतात, असे चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. गेल्या दीड महिन्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, दुरुस्तीचे काम कुठे सुरू आहे, याची पारदर्शक माहितीही मिळत नाही, अशी तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे.
साथीच्या रोगांचा धोका
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दोनदा वीजपुरवठा खंडित होणे, हे नियोजनशून्यतेचे लक्षण असल्याची टीका होत आहे. अजूनही जोरदार पावसाचे दिवस पुढे आहेत. अशा परिस्थितीत महावितरणने तातडीने खबरदारीचे उपाय योजावेत, अन्यथा नागरिकांना पुन्हा पुन्हा अंधारात झगडावे लागेल. अंधारामुळे गटारांतील पाणी साचत असून, डासांची पैदास आणि साथीच्या रोगांचा धोका वाढतो आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.