महापालिका मुख्यालयात ‘दिव्यांग धोरण समन्वय बैठक’
पनवेल,ता. २४ (बातमीदार) दिव्यांग कल्याण धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी व आदर्श दिव्यांग कल्याण धोरण तयार करण्याच्या दृष्टीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या बैठक सभागृहात २२ मे रोजी ‘दिव्यांग धोरण समन्वय बैठक अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकिस उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त अभिषेक पराडकर, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, सचिव अक्षय कदम, कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे, उपअभियंता विलास चव्हाण, दिव्यांग विभागप्रमुख प्रकाश गायकवाड विविध दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी समिती गठित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या समितीमध्ये सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधीदेखील समाविष्ट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने या दिव्यांग कल्याण समितीच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेमध्ये दिव्यांग कल्याण विभागांतर्गत महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींच्या समस्या आणि गरजांचा अभ्यास करणे, तसेच त्यांच्या विकासासाठी उपाययोजना करणे, या उपायांमध्ये अपंग व्यक्तींना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना आवश्यक सुविधा आणि सहाय्य पुरवणे अशा गोष्टींचा पाठपुरावा केला जात आहे.
चौकट
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिव्यांग गाळेवाटप धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या दृष्टीने विविध महानगरपालिकांच्या दिव्यांग गाळेवाटप धोरणाचा अभ्यास करून सर्वसमावेशक असे आदर्श गाळेवाटप धोरणाचा कच्चा मसुदा उपायुक्त रविकिरण घोडके यांनी समितीपुढे वाचून दाखविला. या कच्च्या मसुद्यावर उपस्थित दिव्यांग संघटना पदाधिकारी यांनी त्यांच्या सूचना दिल्या.
चौकट
महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या आदर्श गाळेवाटप धोरण प्रक्रियेमध्ये दिव्यांग संघटनांना सामावून घेऊन, त्यांच्या सूचनांना प्राधान्य दिल्याबद्दल व पनवेल महानगरपालिकेने अति तीव्र दिव्यांग (अंथरुणाला खिळून असलेल्या) व्यक्तींना उदर निर्वाह भत्ता लागू केल्याबद्दल उपस्थित दिव्यांग संघटनांच्या वतीने महापालिकेचे आभार या वेळी मानण्यात आले.
कोट
महानगरपालिका हद्दीमध्ये डिजिटल माध्यमातून दिव्यांग व्यक्तींचा घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे. यामध्ये बहुतांश दिव्यांग व्यक्तींची घरे बंद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की, नागरिकांनी आपल्या संपर्कातील दिव्यांग व्यक्तींचा सर्व्हे झाला असल्याबाबत खात्री करावी व या सर्व्हेबाबत जनजागृती करावी. जेणेकरून कोणताही दिव्यांग व्यक्ती या सर्व्हेतून वगळला जाणार नाही आणि तो दिव्यांग कल्याणाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.