उल्हासनगर, ता. २७ (बातमीदार) : माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने उल्हासनगरातील स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी ‘दारू सोडा, संसार जोडा’ची मोहीम राबवण्याचा संकल्प जाहीर केला आहे. तशी पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केली आहे. त्यासाठी माता रमाई यांनी बाबासाहेबांना दारूच्या व्यसनात अडकलेल्या गोरगरिबांना या व्यसनातून मुक्त करण्यासाठी कशी विनंती केली होती. बाबासाहेबांनी दारूविरोधी कसे आंदोलन केले, याचा दाखला ॲड. जय गायकवाड यांनी दिला आहे.
डॉ. आंबेडकर यांनी दारूबंदी आणि व्यसनमुक्तीच्या विचारांचा प्रचार १९२०च्या दशकात सुरू केला. याचे अधिक सशक्त रूप १९३०च्या दशकात पाहायला मिळते. विशेषतः महाड सत्याग्रह (१९२७) नंतर या आंदोलनाचा पहिला ठोस दस्तऐवजीकरण असलेला प्रसंग १९३५ मध्ये नागपूर येथे झालेला आहे. तेव्हा बाबासाहेबांनी एका मोठ्या सभेत महिलांना आणि पुरुषांना व्यसनमुक्तीच्या शपथ दिल्या. त्यांनी म्हटले होते की, दारू हे दारिद्र्याचे, रोगाचे आणि समाजाच्या अधःपतनाचे मूळ आहे. जोपर्यंत दारू बंद होत नाही, तोपर्यंत समाज सुधारू शकत नाही. त्यावेळी मी दारूच्या थेंबाला हात लावणार नाही, माझ्या घरात कोणालाही दारू पिऊ देणार नाही, माझा पैसा संसारासाठी वापरीन, व्यसनासाठी नाही, मी माझ्या मुला-बाळांना शिक्षण देईन, अशी शपथ देताना दारू ही दारिद्र्याची जननी आहे. ती माणसाच्या बुद्धीचा नाश करते. संसार मोडते, हिंसाचार वाढवते, असे बाबासाहेब म्हणाले होते. हे चित्र पाहता माता रमाई यांच्या स्मृतिदिनी ‘दारू सोडा, संसार जोडा’ची मोहीम राबवण्यात येणार आहे. अभियान यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि रमाईला स्वराज्य संघटनेचे हेच खरे अभिवादन असेल, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
पोस्टद्वारे खंत व्यक्त
आजही ८०, ९० वर्षांनंतर तीच परिस्थिती आहे. अनेक घरांमध्ये पुरुष पगाराचा पैसा दारूत उडवतात, स्त्रियांवर अत्याचार होत आहे. मुले शाळा सोडतात. आजार, कर्जबाजारीपणा, भांडणे याचे मूळ कारण दारू ठरत आहे. आता तर लोक ज्या बाबासाहेबांनी दारूविरोधात आंदोलन उभे केले, त्यांच्या जयंती दिवशी दारू पिऊन नाचतात. नेमके आपण कुठे चाललो आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशी खंत ॲड. गायकवाड यांनी पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.