सुनील कोकरे : सकाळ वृत्तसेवा
वाणगाव, ता. ३१ : डहाणू तालुक्यातील नरपड येथील तरुण युवा शेतकरी प्रतीक पाटील यांनी आपल्या फळबागेमध्ये पारंपरिक पिवळ्या रंगाच्या केळीसोबतच जांभळ्या-लाल सालीच्या केळीची लागवड केली आहे आणि त्यामध्ये यशही मिळाले आहे. केळीचे लोंगर चांगल्या स्थितीत असताना प्रामुख्याने दिसण्यात येत आहेत. त्यामुळे अशा नावीन्यपूर्ण प्रयोगाचे आकर्षण वाढत आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकरी हे आधुनिक विचारसरणीचे असल्याने परिस्थितीनुसार बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करत आहेत. सध्या जिल्ह्यात बदलते वातावरण, अवकाळीचे संकट अशा अनेक कारणांमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. जिल्ह्याच्या समुद्रकिनारी भागात आंबा, चिकूच्या बागा विस्तारल्या आहेत, तर काही भागांत केळी, जाम, लीची, नारळ अशा फळबागांचे क्षेत्रही विस्तृत प्रमाणात आहे. मागील पंधरा वर्षांत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथून कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या शेतीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या दुर्मिळ पिकांची लागवड करून शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत. असाच यशस्वी प्रयोग डहाणू तालुक्यातील नरपड येथील तरुण युवा शेतकरी प्रतीक पाटील यांनी केला आहे. त्यांनी जांभळ्या-लाल सालीच्या केळीची लागवड केली आहे.
खास वैशिष्ट्य
लाल केळी लालसर किंवा जांभळ्या रंगाच्या सालीची असते, जी साधारण केळीपेक्षा वेगळी दिसते. पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या केळी या सुरुवातीच्या अवस्थेत असताना रंग हिरवा असतो. पिकल्यानंतर त्याचे रूपांतर पिवळ्या रंगात होते. नवीन जातीच्या केळीचा रंग केळी कच्ची असताना जांभळा असतो आणि पिकल्यानंतर ती लाल होतात, हे खास वैशिष्ट्य आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर
बाजारात पिवळ्या रंगाची केळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. केळी खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लाल सालीची केळी प्रामुख्याने दक्षिण भारतात म्हणजे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक, आग्नेय आशिया आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर पिकवली जातात. या केळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. हृदय आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात लाल केळ्यांचे सेवन करावे. ही जास्त मऊ आणि गोड असते. पिवळ्या केळीपेक्षा अधिक पौष्टिक मानली जाते. पिवळ्या आणि हिरव्या केळ्यांपेक्षा लाल केळी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.
पारंपरिक शेती पद्धतीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. खते, औषधे, मजुरी यांचे खर्च भरमसाठ वाढल्याने शेतीतून अपेक्षित उत्पादन साध्य होत नाही. पारंपरिक पिवळ्या सालीच्या केळी लागवडीबरोबरच प्रायोगिक तत्त्वावर लाल केळीची लागवड केली. कृषी तंत्र विद्यालयातून कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेतीकडे वळलो. जिल्ह्यातील तरुण युवा शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची तंत्रे अवगत करून दुर्मिळ आणि शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळावे.
- प्रतीक पाटील, युवा शेतकरी, नरपड, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.