तुर्भे एमआयडीसीत भीषण पाणी समस्या
रात्री-अपरात्री अनियमित पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये रोष
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः तुर्भे एमआयडीसी परिसरातील इंदिरानगर, गणपती पाडा आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. या सर्व ठिकाणी होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक बेहाल झाले आहेत. शिवाय, रात्री-अपरात्री होत असल्याने पाणीपुरवठ्यामुळे जीवनमान विस्कळित झाले आहे. तर कधी कधी सलग दोन किंवा तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
स्वतःच्या मालकीचे धरण असूनही येथील वस्त्यांना आपली तहान एमआयडीसीच्या पाण्यावर भागवावी लागते. अवकाळी पावसामुळे मोरबे धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना आजही पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनियमित व रात्री-अपरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून मध्यरात्रीच्या सुमारास पाणी सोडले जात असल्याने राहिवशांना पाण्यासाठी रात्र जागवून पाणी भरावे लागते. कधी रात्री बारा वाजता तर कधी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा होतो. याशिवाय पाण्याचा प्रवाहदेखील कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोटर लावून पाणी भरावे लागते. मोटरमुळे परिसरात वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. याबाबत शिवसेनेच्या उबाठा गटाकडून वारंवार पाणीपुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार तसेच समक्ष भेट घेऊन पाण्याची समस्या निकाली लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे; मात्र पाण्याची समस्या जैसे थे असल्याने अखेर उबाठाकडून तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तर याआधी हंडा मोर्चा काढण्यात आला होता; मात्र तरीदेखील पाणी समस्या मिटलेली नाही.
.........
दैनंदिन जीवनावर परिणाम
एमआयडीसीकडून जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेतला जातो. त्या वेळी शुक्रवारपासून जो पाणीपुरवठा बंद केला जातो, तो रविवारी संध्याकाळनंतर सुरळीत होतो. पाण्यामुळे परिसरात हाणामारीचे प्रसंगदेखील उद्भवले जातात. तुर्भे परिसरात पाण्यासाठी लाखो रुपये खर्चून जलकुंभ बांधले आहेत; मात्र एमआडीसीकडून होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत असल्याने जलकुंभ भरलादेखील जात नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील रहिवाशांना चार ते पाच तास थांबून राहावे लागते, त्यामुळे त्यांना कामावर जाण्यासही अडचण होते.
.............
तुर्भे विभागातील गणपती पाडा, इंदिरानगर, हनुमाननगर या प्रभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना अनियमित पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे २ जूनला तुर्भे विभाग कार्यालयावर पुन्हा ठिय्या आंदोलन केले जाईल.
- महेश कोटिवले, उपशहरप्रमुख, उबाठा
...............
कोपरखैरणेमध्ये दूषित पाण्यामुळे रोगराईची भीती
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : कोपरखैरणे सेक्टर १८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील रहिवाशी जुलाब, उलट्या यांसारख्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या भागातील होत असलेला दूषित पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोपरखैरणे सेक्टर १७ व १८ येथील जलवाहिन्या ड्रेनेज लाइनच्या जवळून गेल्या आहेत. काही ठिकाणी गळतीमुळे ड्रेनेजमधील घाण पाणी जलवाहिन्यांमध्ये मिसळत आहे. परिणामी, नळातून घरामध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच, या पाण्याला दुर्गंधी येत आहे. विशेष म्हणजे, सेक्टर १७ मधूनही अशाच प्रकारच्या दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या समस्येबाबत भाजपच्या शक्तिकेंद्राचे प्रमुख वसंत जाधव यांनी सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांना निवेदन देऊन या भागात शुद्ध पाणीपुवठा करण्याची मागणी केली आहे. महापालिकेने याची दखल घेऊन दूषित पाण्याचा स्रोत शोधण्याचे काम हाती घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.