शिवसेनेच्या शाखांमध्ये असंतोषाची पेरणी
शिवसेना ठाकरे गट निवडणुकीसाठी आक्रमक भूमिकेत
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष जमीनदोस्त होण्याच्या केलेल्या वक्तव्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पक्ष सोडून गेले त्यांना मतदारसंघात जनाधार नाही. त्यांनी लालसेपोटी, विकास निधी मिळावा यासाठी पक्ष सोडला आहे. शिवसेना संपविण्यासाठी निघालेल्यांविरोधात असंतोषाची पेरणी मुंबईतील शाखांमध्ये सुरू आहे, अशी माहिती काही माजी नगरसेवकांनी दिली.
महाजन यांचे विधान शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागले आहे. पैसा फेको तमाशा देखो, असे आताचे राजकारण असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मार्मिक विधान करून फोडाफोडी करणाऱ्या महायुतीवर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा उभारी घेणार, असा ठाम विश्वास या पक्षातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांना वाटत आहे. स्वार्थासाठी, निधीसाठी आणि आमिषापोटी माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये गेले असल्याची टीका ठाकरे गटातून होत आहे. शाखांच्या माध्यमातून शिवसैनिकांनी महायुतीविरुद्ध निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत आक्रमकपणे लढण्याची तयारी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि निष्ठावान शिवसैनिक करू लागले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाला मोठे धक्के बसले आहेत. राज्यासह मुंबईतील माजी नगरसेवकही उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. ठाकरे यांनीही त्याची दखल घेतली आहे. अलीकडेच कट्टर शिवसैनिक असलेले संजय घाडी व संजना घाडी हे माजी नगरसेवक राजीनामा देऊन शिंदे गटात गेले. ज्येष्ठ नगसेविका राजूल पटेल, माजी महापौर दत्ता दळवी, राजू पेडणेकर आदी माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. यातील जवळपास सर्वांनी पक्ष सोडताना नाराजीचे कारण दिले. आता तेजस्वी घोसाळकर यांनीही महिला विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त करूनही पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. मातोश्रीने त्यांची नाराजी दूर केली आहे. आतापर्यंत ४०च्या वर माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते, माजी नगरसेवकांची पक्षातील ही गळती ठाकरे यांना रोखता आलेली नाही. दरम्यान, ही गळती अमिषापोटी होत असल्याचे शिवसैनिक ठामपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. असे असले तरी मुंबईतील तळागाळातील कट्टर शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत असल्याचे दिसत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. सर्व पातळ्यांवर सरकार अपयशी ठरले असून, सरकारमधील मंत्रीच ते कबूल करीत आहेत. आम्ही निवडणुकीची वाटच पाहात आहोत.
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर
मुंबईत शिवसेना पाहिजे. मुंबईकरांच्या नागरी प्रश्नांवर शिवसेना लढे देते. आंदोलन करते. त्यामुळे कधीही निवडणूक लागली तरी आम्ही तयार आहोत.
- श्रद्धा जाधव, माजी महापौर
निष्ठा विकलेले लोक तिकडे गेले आहेत. भविष्याची चिंता करून उद्धव ठाकरे यांनी जमवलेल्या पालिकेच्या ठेवी त्यांनी संपवल्या. त्यांना मुंबईकर धक्का देवून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणून देशाला वेगळा संदेश देणार.
- अनिक कोकीळ, माजी अध्यक्ष, बेस्ट समिती
मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची मानून गेल्या तीन वर्षांपासून आदित्य ठाकरे सक्रिय आहेत. मुंबईतील विविध प्रश्नांवर बैठका, पत्रकार परिषदा घेऊन मुंबई शहरचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते टार्गेट करीत आहेत. आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांचाही प्रतिसाद मिळत आहे.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.