सुपरस्पेशालिटी रुग्णालय रखडले
केडीएमसीची तिसऱ्यांदा निविदा : नागरिकांच्या वाट्याला प्रतीक्षा
कल्याण, ता. ११ : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा परिसरात सुसज्ज इमारतीत उभारलेले सुपरस्पेशालिटी रुग्णालय अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्याचा निर्णय यापूर्वीच प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, निविदा काढण्यासाठी कन्सल्टंट मिळत नसल्याने हे रुग्णालय निविदा प्रक्रियेतच अडकले आहे. या रुग्णालयाच्या दोन वेळा निविदा काढण्यात आल्या, मात्र दोन्ही वेळा कोणत्याही संस्थेने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या निविदेला तरी कोणी प्रतिसाद देते का याच्या प्रतीक्षेत केडीएमसी आहे. या निविदा प्रक्रियेमुळे या महत्त्वाकांक्षी रुग्णालयाचा मुहूर्त वारंवार लांबणीवर जात आहे.
केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार गौरीपाड्यातील १६ हजार चौरस फूट जागेत तीनमजली इमारतीत १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात आले आहे. या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सर्जिकल आणि मेडिकल आयसीयू, किडनी स्टोनसाठी सुविधा, हृदयविकारांवरील उपचारासाठी कॅथलॅब यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे या रुग्णालयाकडे सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
पालिकेच्या रुग्णालयात आवश्यक उपचार मिळविण्यासाठी रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने पीपीपी तत्त्वावर सुरू होणाऱ्या या रुग्णालयातून तरी सर्वसामान्यांना सुविधा मिळतील, अशी वेडी आशा नागरिकांना वाटत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी हे रुग्णालय सुरू करण्यासाठी निविदा काढण्याचे निर्देश दिले होते. यानंतर मागील सहा महिन्यांत या रुग्णालयाचे दर निश्चित करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्यासाठी दोन वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली; मात्र कन्सल्टंटकडून निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याने आता प्रशासनाने तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेला तरी प्रतिसाद मिळतो का, यावर रुग्णालयाचे भवितव्य अवलंबून आहे.
सामुग्री, सुविधांचे दर निश्वित
उपायुक्त प्रसाद बोरकर म्हणाले, की हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या रुग्णालयात आवश्यक असणारी सामुग्री, सुविधा आणि कर्मचारी याबाबतचे दर कन्सल्टंटच्या माध्यमातून निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळेच कन्सल्टंटची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. दोन वेळा निविदा प्रसिद्ध केली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया रखडल्याने तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.