मनोर, ता. १२ (बातमीदार) : आरसीएफच्या चेंबूर येथील कारखान्यातून खताची उत्पादन प्रक्रिया बंद झाल्यामुळे पालघर जिल्ह्यात खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खरीप हंगामातील पेरणीच्या काळात खतपुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील मोठे वितरक लहान वितरकांना खत उपलब्ध करून देत नसल्याने कृषी सेवा केंद्रावर भात बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच खत उपलब्ध करून दिले जात आहे. खताचा पुरवठा मर्यादित झाल्यामुळे साठेबाजीची शक्यता वर्तवली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील लहान वितरक असलेल्या कृषी सेवा केंद्राची मागणी आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत स्वीकारली जात नसल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर कृषी सेवा केंद्राच्या मालकाने दिली. बफर स्टॉकमधील खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आरसीएफचा चेंबूर येथील युरिया व संमिश्र खत निर्मितीचा कारखाना तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. त्याचा खत निर्मितीवर परिणाम झाल्याने आरसीएफकडून राज्यभरात होणाऱ्या खतपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची वेळ येऊन ठेपली आहे. अशात शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळणे गरजेचे आहे. खताअभावी पेरणी केलेल्या पिकांची वाढ बाधित होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची भीती पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खतपुरवठ्याची मागणी
खतांचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी आरसीएफ कंपनीच्या रायगड जिल्ह्यातील थळ येथील कारखान्यातून खतपुरवठा सुरू करण्याची मागणी पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि कृषी सेवा केंद्रचालकांकडून केली जात आहे. तसेच, तात्पुरता खतपुरवठा वाढवण्यासाठी अन्य स्रोतांचा विचार करावा, असेही सांगितले जात आहे.
उत्पादन प्रक्रियेला वेग
चेंबूर येथील कारखान्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उत्पादन प्रक्रिया बंद झाली होती; परंतु दुरुस्तीच्या कामानंतर कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू झाली आहे; परंतु खतपुरवठा योग्य रीतीने केला जात असल्याची माहिती आरसीएफचे प्रतिनिधी गोवेकर यांनी दिली.
पालघरसाठी जूनसाठी मंजूर असलेला खताचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. युरिया खताची मागणी पेरणीच्या काळात अधिक असते. जिल्ह्यात खतपुरवठा झालेला आहे, साठेबाजी होणार नाही, तसेच शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
- सोमनाथ पिंजारी, जिल्हा कृषी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद
पालघर जिल्ह्यासाठी मंजूर खतपुरवठा (आकडेवारी टनमध्ये)
महिना युरिया डीएपी एमओपी एनपीके एसएसपी एकूण
एप्रिल १,३१० ३८ ०६ १३० २१ १,५०४
मे १,७०२ ६३ ०८ २६० ३६ २,०६९
जून २,७५० १०९ १५ ६७६ ७५ ३,६२५
जुलै ३,०१२ ७५ १७ ५९८ ६३ ३,७६५
ऑगस्ट २,३५७ ७१ १८ ५२० ५७ ३,०२३
सप्टेंबर १,९६४ ६३ १७ ४१६ ४८ २,५०८
एकूण १३,०९५ ४१८ ८० २,६०० ३०० १६,४९३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.