शाळा प्रवेशोत्सवाला नेत्यांची हजेरी
ठाणे पालिकेच्या शाळांमध्ये मंत्री, आमदार, खासदारांची हजेरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः नवा गणवेश, नव्या पाठ्यपुस्तकांचा सुगंध, नवा वर्ग यामुळे शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक उत्सवच असतो. या उत्साहात यंदा मंत्री महोदयांसह आमदार, खासदारांनी पालिका शाळांमध्ये हजेरी लावली. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात एक ते दीड महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (ता. १६) शाळा सुरू झाल्या. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी शासकीय, खासगी, शाळा प्रशासनाने मंत्री, आमदार, खासदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील शाळांमध्ये प्रवेशोत्सवात सहभागी करून घेण्यात आले असल्याचे दिसून आले. त्यानुसार किसननगर शाळा क्रमांक २३ व टेंभी नाका येथील ठाणे महापलिकेच्या शाळेत खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना महिला शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे औक्षण केले. तर खासदार नरेश म्हस्के यांनी गुलाबाचे फूल देऊन त्यांचे शाळेत स्वागत केले.
ठाणे महापालिका शिक्षण विभाग शाळा क्रमांक ५५, आझादनगर येथे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मुलांना शालेय पुस्तक मोफत देण्यात आले. तसेच फूल व खाऊ देऊन मुलांचे शाळेत स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस म्हणून मुलांच्या पायाचा ठसा उमटवला. तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील ठाणे पालिकेची शाळा क्रमांक ४४ वर्तकनगर येथे भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
ग्रामीण भागातदेखील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. त्यांच्यासह प्रांताधिकारी अमित सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, तहसीलदार अभिजित खोले पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ, शाळेत प्रवेशपावलांचे ठसे घेतले. तसेच टिळा लावून स्वागत करण्यात आले. विविध रंगीत फुगे, रांगोळ्या व सजावट यामुळे शाळा आकर्षक सजली होती. बालके व मान्यवरांचे स्वागत लेझीम व ढोल-ताशाच्या गजरात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे मन जिंकले.
.................................
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता आधारित शिक्षण मिळावे, यासाठी शासन व प्रशासन सजग आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि मूल्यमापन या सर्व बाबींमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना दाखल करून द्यावे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.
- अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे
.........................................
शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरावी, यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. शाळा प्रवेशोत्सवासारखे उपक्रम हे समाजात शैक्षणिक जागृती घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पालकांनी आपल्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विश्वासाने प्रवेश द्यावा, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.
- रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.