टीओडी मीटर ग्राहकांच्या फायद्याचे
कैलास होम्स सोसायटीत महावितरणची जगजागृती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : गौरीपाडा येथील कैलास होम्स सोसायटीत टीओडी मीटर बसवताना एजन्सीच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर कल्याण पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी सोसायटीला भेट देत टीओडी मीटरबाबत असलेले वीज ग्राहकांचे गैरसमज दूर केले. टीओडी मीटरपासून ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांबाबत ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
महावितरणतर्फे राज्यभरात अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर लघुदाब वीज ग्राहकांकडे बसवले जात आहेत. महावितरणच्या नव्या वीजदर प्रस्तावात ग्राहकाने वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत प्रस्तावित आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही. वीज ग्राहकांकडे बसवण्यात येत असलेले मीटर प्रीपेड नव्हे तर पोस्टपेड आहेत. त्यामुळे पहिल्यासारखाच विजेचा वापर केल्यानंतर बिल येणार आहे. आधुनिक मीटर असल्यामुळे अचूक रिडिंग तसेच महावितरण व ग्राहकांना सातत्याने मोबाईलवर विजेचा वापर समजण्यासारख्या नव्या सुविधा यात आहेत. मुख्य म्हणजे महावितरणकडून ‘सुधारित वितरण क्षेत्र योजना’ या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेतून ग्राहकांकडे हे मीटर मोफत बसविण्यात येत आहेत.
महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात आतापर्यंत २४ हजार लघुदाब वीज ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता चौधरी यांनी दिली. त्यासोबतच वीज नियामक आयोगाच्या तरतुदीप्रमाणे ग्राहकांच्या अचूक वीजबिलासाठी ग्राहकांकडे अत्याधुनिक मीटर बसवणे ही महावितरणची जबाबदारीच नव्हे तर अधिकारही असल्याचे त्यांनी नमूद केले. या कामात आडकाठी ही सरकारी कामात अडथळा ठरेल तसेच ग्राहकांनी कोणत्याही गैरसमजावर विश्वास न ठेवता टीओडी मीटर बसवण्याच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.