नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २३ : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील २५ जून १९७५ असा दिवस जेव्हा संपूर्ण देशावर अंधार पसरला. नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली आणि लोकशाहीचे मूल्य संकटात सापडले. आज त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असताना, देशभरात त्या काळाची स्मृती जागवण्याचा आणि त्यातून घेतलेल्या शिकवणीचे भान राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘आणीबाणी विशेष स्मरण प्रदर्शन’ भरवण्यात येत आहे. उल्हासनगर महापालिकेतर्फेही २५ जूनपासून हे विशेष प्रदर्शन शहरात भरवण्यात येणार आहे.
विशेष प्रदर्शनाच्या माध्यमातून १९७५ ते १९७७ या आणीबाणी कालखंडातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेण्यात येणार आहे. त्या काळातील सामाजिक, राजकीय परिणाम आणि लोकशाही रक्षणासाठी लढणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचे चित्रण केले जाईल. नागरिकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करून लोकशाही मूल्यांबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत या प्रदर्शनात स्थानिक संदर्भ जोडण्यासाठी उल्हासनगरमधील आणीबाणी काळातील आंदोलनकर्ते, त्यांचे अनुभव, संघर्ष आणि छायाचित्रांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी ऐतिहासिक माहितीबरोबरच तिच्याशी संबंधित प्रमाणबद्ध मजकूरही आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उल्हासनगरकरांनी आपल्या परिसरातील लोकशाहीच्या लढ्यात सहभागी झालेल्या व्यक्तींना या उपक्रमातून श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी या पत्रकातून केले आहे. हे प्रदर्शन केवळ इतिहासाचे दस्तऐवजीकरण नाही, तर पुढील पिढ्यांना लोकशाहीच्या मूल्यांचे भान देणारे एक प्रेरणादायी स्मरण ठरणार आहे.
१९७५मधील आणीबाणी हा भारताच्या लोकशाही प्रवासातील एक अत्यंत धक्कादायक पण शिकवण देणारा टप्पा होता. त्या काळात लोकांनी ज्या धैर्याने आणि संयमाने परिस्थितीचा सामना केला, ते आजच्या तरुण पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. उल्हासनगरमधील हे विशेष प्रदर्शन केवळ इतिहासाची झलक नसून, लोकशाही मूल्यांची आठवण करून देणारा आरसा ठरेल. नागरिकांचा सहभाग या प्रदर्शनात महत्त्वाचा असून, परिसरातील संघर्षकर्त्यांच्या आठवणी जतन करून त्यांच्या कार्याला सन्मान देऊ या.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
माहिती संकलित करण्याचे आवाहन
१९७५-७७ या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती संकलित केली जावी. यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, त्यांच्या अनुभवाचे संक्षिप्त वर्णन, त्या काळातील आणि सध्याचे छायाचित्र, तसेच उपलब्ध असल्यास त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा व्हिडिओ बाईट कार्यालयीन वेळेत हार्ड व सॉफ्ट कॉपी स्वरूपात महापालिकेकडे सादर करावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
चित्रपटगृहांना लघुचित्रफीत दाखवण्याची विनंती
प्रदर्शनात आणीबाणीशी संबंधित छायाचित्रे, तत्कालीन बातम्यांचे अंश, सरकारी आदेशपत्रे, जनतेने दिलेला विरोध, आंदोलनांची चित्रे, अटक झालेल्या व्यक्तींच्या कहाण्या आणि केंद्र सरकारने तयार केलेली लघुचित्रफीत सादर केली जाणार आहे. ही लघुचित्रफीत www.amritkaal.nic.in या संकेतस्थळावर २२ जूनपासून उपलब्ध केली आहे. उल्हासनगर शहरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये ती दाखवावी, अशी विनंती महापालिकेने संबंधित चित्रपटगृह मालकांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.