गतिरोधकाचा काही तासांत चुराडा
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : विजयनगर येथील पुणे लिंक रोडवरील उतार हे अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. उतारावरून वेगाने खाली येणाऱ्या अवजड वाहनांचे ब्रेक फेल झाल्याने विजयनगर परिसरात मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून बुधवारी (ता. २५) फायबरचे गतिरोधक बसविले आहेत; मात्र अवघ्या काही तासांतच वाहनांच्या वर्दळीमुळे या गतिरोधकांचा चुराडा झाला आहे. त्यामुळे वाहनचालक महापालिकेवर ताशेरे ओढत आहेत.
पुणे लिंक रोड हा कल्याण व उल्हासनगरला जोडणारा सततच्या रहदारीचा मार्ग आहे. विजयनगर येथील तीव्र उतारावर प्रशासनाकडून चार ठिकाणी फायबर गतिरोधक बुधवारीच बसविण्यात आले; मात्र त्याच दिवशी त्यांचा चुराडाही झाला. यामुळे हे गतिरोधक बसविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता परीक्षण केले होते की नाही, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. हा एकप्रकारे सामान्य नागरिकांच्या कररूपी भरलेल्या पैशांचा चुराडा आहे, अशा टीका नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. याच रस्त्याशी समांतर असलेला शंभर फूट रस्ता अपूर्णावस्थेत आहे. जर तो रस्ता पूर्ण होऊन वापरात आला तर पुणे लिंक रोडवरील वाहतुकीचा भार काहीसा कमी होईल, असे सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे सांगण्यात येते.
वरवरची मलमपट्टी
गतिरोधक बसविणे म्हणजे उपाय नव्हे. ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. खरे उपाय हे दीर्घकालीन नियोजनात, रस्ता विस्तारात आणि वाहतूक व्यवस्थापनात आहेत. आज जी चूक काम केल्याचे दाखवून झाकली जाते आहे, ती उद्या कुणाचे आयुष्य हिरावू शकते हे महापालिकेने विसरू नये, अशी टीका येथील नागरिक श्रीरंग क्षीरसागर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.