मुंबई

हिंदी सक्तीच्या मुद्यावर एकवटणार मराठी मते

CD

हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर एकवटणार मराठी मते
उद्धव ठाकरे यांचा लागणार कस
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः हिंदीच्या सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. ही एकजूट कायम राहिल्यास पालिका निवडणुकीतील चित्र बदलण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणाला अनेक पदर असून, त्यात उद्धव ठाकरे यांचा कस लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याची चर्चा होती. दोन्ही पक्षांनी हिंदीसक्तीच्या विरोधात ५ जुलै रोजी एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दोघे भाऊ एकत्र येण्याचे विविध राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दोघा भावांनी एकत्र यावे, अशी सर्वांची इच्छा होती. गेल्या काही दिवसांत मनसैनिक आणि शिवसैनिकांची दिलजमाई झाली. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांच्या दबावापोटी एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे दिसते. मोर्चानंतर दोन्ही बंधू हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येतील की नाही, हे अद्याप अस्‍पष्‍ट आहे. मात्र दोघा भावांच्या एकत्र येण्याने मराठी मतांचे विभाजन टळेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदीसक्तीच्या विरोधात मराठी मते एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे. त्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचाही पाठिंबा मिळत आहे. त्याचा निवडणुकीत भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.

भाजपचे गणित बिघडणार
भाजपाला मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी भाजपची व्यूहरचना सुरू आहे. राज ठाकरे यांना खेचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीस आणि राज यांची भेट झाली. मात्र दोन्ही भाऊ एकत्र आल्यास, पालिका निवडणुकीत मराठी व्होट बॅंक एकत्र आल्यास भाजपाची सगळी गणिते बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचाही राज यांच्याकडे ओढा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. मंत्री दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत यांनी राज यांचे मन वळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले नसल्याचे दिसते. शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला ४० माजी नगरसेवकांसह मनसेची ताकद मिळाली असती तर मुंबईत मोठा फरक पडला असता, असे वाटत आहे. अलीकडे उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र महायुती म्हणून ते लढणार आहेत.

उद्धव ठाकरे यांची कसोटी
पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना महायुतीला सामोरे जावे लागणार आहे. पालिका निवडणुका अजून काही महिन्यांवर आहेत. या काळात राज ठाकरे हे एकत्र राहतील यावर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही भरोसा नाही. मात्र मराठी व्होट बँक सुरक्षित ठेवणे ही खरेतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी कसोटी आहे. निवडणुकीच्या आधी भाजपकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अडचणींतून दोघा भावांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्व घटकांतून पाठिंबा
कोणताही झेंडा न घेता हिंदीसक्तीच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चाला विविध समाज घटकांतून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेदेखील या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.

दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटोकाट प्रयत्न करीत आहेत. या भावांची एकी एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचे चिन्ह आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात हिंदी भाषिकांची संख्या वाढतेय. त्यामुळे हिंदीसक्तीच्या निर्णयाचा युतीला फायदा होऊ शकतो. तसेच राज ठाकरे महायुतीत न आल्याने त्याचा फायदा बिहारच्या निवडणुकीत भाजपाला होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, त्यांची भूमिकाही आता महत्त्वाची ठरणार आहे.
- हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT