मोठागावमध्ये १७१ लोकांची नेत्रतपासणी
डोंबिवली (बातमीदार) : संत निरंकार मंडळ, डोंबिवली शाखा आणि शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, वडाळा (मुंबई) याच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात १७१ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यात ६५ मोतीबिंदूचे रुग्ण आढळले. त्याच्यातील ३२ रुग्णांना तत्काळ शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, वडाळा येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर गुरुवारी (ता. ३) त्यांना संत निरंकरी भवन, मोठागाव, डोंबिवली येथे पाठवले जाईल. सकाळी साडेनऊपासून दुपारी दीड वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराला यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी मंडळ, शाखा डोंबिवली, चंद्रकांत कणसे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे योगदान दिले.
..............
सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश दीक्षित निवृत्त
कल्याण (बातमीदार) : रेल्वे सुरक्षा दलात तब्बल ३९ वर्षे सेवा दिल्यानंतर कल्याणचे सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश दीक्षित हे आता आपल्या कर्तव्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. नुकताच त्यांचा निरोप समारंभ पार पडला. या निरोप समारंभात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा तसेच वरिष्ठांचा निरोप घेत आपल्या चार दशकांच्या सेवेला पूर्णविराम दिला. सुरेश दीक्षित यांनी ३९ वर्षांत कल्याण, डोंबिवली, मुलुंड, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, शिवडी, भुसावळ, मनमाड, शिर्डी, कोपरगाव अशा ठिकाणी कर्तव्य बजावले. डोंबिवलीतील प्रसिद्ध व्यावसायिक डॉ. सुनील खर्डीकर यांनी सन्मानचिन्ह देऊन दीक्षित यांचा गौरव केला. तुम्ही इतकी वर्षे आरपीएफमध्ये सेवा दिली. गोरगरीब व गरजूंनाही मदत करीत आला आहात. अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना दुसरीकडे माणूस म्हणून माणुसकीदेखील जपलीत. त्यामुळे निवृत्तीनंतरचे तुमचे पुढील आयुष्य स्वामींच्या कृपेने सुखकर होवो, अशा शुभेच्छा या वेळी त्यांना देण्यात आल्या.
..................
स्वयंचलित जिने बसवण्याची मागणी
पडघा (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या कसारा, आसनगाव रेल्वे मार्गावर असलेल्या खडवली रेल्वेस्थानकावर स्वयंचलित जिने बसवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिंवडी, कल्याण तालुक्यातील पडघा, खडवली दुर्गम भागातील हजारो चाकरमानी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, रोजंदारी कामगार, महिला कामगार दररोज खडवली स्टेशनवरून रोजगार, शिक्षण, भाजीपाला विक्री आणि विविध कामांसाठी मुंबई व उपनगरांत जातात; मात्र खडवली स्थानकावर प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. खडवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा तिकीट खिडकी व रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी असणारा रेल्वे पूल खूप उंच असल्याने त्याच्या पायऱ्या चढून जाताना वृद्ध, विद्यार्थी, महिला, नागरिकांची दमछाक होत आहे. या रेल्वे पुलाच्या पायऱ्यांचे अंतरसुद्धा उंच असल्याने पाय अडकून अपघाताची भीती व्यक्त होत आहे. तसेच हा रेल्वे पूल चढून जाताना उशीर होतो. पडघा, खडवली परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, प्रवाशांची व खडवली रेल्वेस्थानकाजवळ बारमाही वाहणारी भातसा नदी असल्याने मुंबई व उपनगरातील पर्यटकांची संख्या वाढल्याने रेल्वे उत्पन्नातही वाढ झाली आहे.
.................
प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान
टिटवाळा (वार्ताहर) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणजे १ जुलै ‘कृषिदिन’ म्हणून राज्यभर साजरा केला जातो. यानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग व कल्याण पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या हस्ते जिल्हा आणि तालुका स्तरावरील एकूण ३० ते ३५ प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. दुंदाराम अण्णा चौधरी, भगवान जानू सावंत (आदिवासी शेतकरी) सोनीबाई बापू राऊत यांना जिल्हास्तरावरील प्रमुख पुरस्काराने सन्मानित केले. तर गणपत हिंदोळे, बाबू गायकर, तुकाराम कोर, प्रकाश मिरकुटे, दीपक चव्हाण, सुमित्रा गायकर, जयवंत दिवाणे आदींसह एकूण ३० हून अधिक शेतकऱ्यांना तालुका स्तरावरील शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी गटविकास अधिकारी संजय भोये, कृषी अधिकारी सुनील संत, कृषी मंडळ अधिकारी रवींद्र घुडे, सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत कांबळे यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमाचे आयोजन कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे व कृषी विस्तार अधिकारी सुनील संत यांनी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.