कासारवडवली उड्डाणपुलाला लोकार्पणाची प्रतीक्षा
ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर व्हावी, यासाठी वडवली येथे ठाणे घोडबंदर वाहिनीवर उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पुलाच्या उद्घाटनाला मंत्री, नेत्यांच्या तारखा मिळत नाहीत. त्यामुळे पूल तयार झालेला असतानाही वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे, हे महत्त्वाचे नाही, तो पूर्ण होताच त्याच दिवसापासून वाहतुकीसाठी खुला करणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी मागणी होत आहे.
घोडबंदर मार्ग हा जेएनपीटी बंदर आणि गुजरातमधील महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून नाशिक, मुंबई, पुणे, जेएनपीटी बंदर येथून गुजरातकडे मोठ्या प्रमाणात मालवाहू, जड-अवजड वाहनांसह हलक्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे हा महामार्ग दिवस-रात्र वाहनांच्या वाहतुकीने गजबजलेला असतो. या मार्गाचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन्ही बाजूकडील सेवारस्ते मुख्य रस्त्यात विलीन करण्यात येत आहेत. असे असतानाही माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, ब्रह्मांड, कासारवडवली अशा सिग्नलवर वाहनांची मोठी कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महापालिका, एमएमआरडीए, मेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे. या सर्व यंत्रणांचे काम एकाच वेळी सुरू असून, त्यामुळे या महामार्गावर सतत कोंडी होत आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, परिणामी वाहतुकीची गती मंदावली आहे. त्याचा फटका रोज या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. नागरिकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. जे कुमार कंपनीकडून बांधलेला हा पूल पूर्ण झालेल्या अवस्थेत पालिकेला सुपूर्द केला आहे. त्यामुळे तो काही दिवसांपूर्वीच तयार झाला असून, वाहतुकीसाठी खुला होणे आवश्यक आहे; मात्र तो अद्याप खुला करण्यात आला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अधिकृतपणे तो त्वरित खुला केला नाही, तर परिसरातील त्रस्त नागरिकांकडून खुला केला जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे, तर हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी पूर्णतः सज्ज असल्याचे जे कुमार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
तारीख पे तारीख
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या पुलाच्या लोकार्पणाची तारीख १५ एप्रिल सांगितली होती; मात्र काम पूर्ण न झाल्याने ती ३१ मे अशी करण्यात आली, परंतु आता ती आणखी पुढे नेण्यात आल्याची माहिती मिळते आहे. हा मार्ग आणि हा पूल ज्या ठिकाणी बांधला आहे, तो वडवली चौक प्रचंड वाहतूक कोंडी करणारा आहे. स्थानिकांना येथून रस्ता ओलांडताना २०-२५ मिनटे उभे राहावे लागते, पण आता त्यांची या त्रासातून मुक्तता होणार आहे, मात्र लोकार्पणासाठी लोकांना तारखेवर तारीख दिली जात आहे.
घोडबंदर मार्गावर राहणे प्रचंड त्रासदायक झाले आहे. येथील वाहतूक कोंडी ही सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे एक एक फूट जागा वाहतुकीसाठी मोकळी करणे आवश्यक असताना हा उड्डाणपूल तयार होऊन काही दिवस झालेले असतानाही तो वाहतुकीसाठी खुला केला जात नाही. मंत्री पुढाऱ्यांना घोडबंदर परिसरातील नागरिकांच्या दुःख कळणार आहे की नाही. याचे त्वरित उद्घाटन झाले नाही, तर तो वाहतुकीसाठी नागरिकांकडून खुला केला जाईल.
गिरीश पाटील, जस्टीस फॉर घोडबंदर ग्रुप
फोटो : उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उड्डाणपूल
कोट फोटो : गिरीश पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.