अंबरनाथ, ता. ३ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक नऊमधील असलेल्या दुरवस्थेचे वृत्त ‘सकाळ’ गुरुवारी (ता. ३) प्रसिद्ध होताच पालिकेची प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नगरपालिकेचे अभियंता राजेश तडवी यांनी गुरुवारी शाळेला भेट देऊन गैरसोयींची पाहणी केली आणि शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आढावा घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने आता हालचालींना वेग आला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची शिवमंदिरासमोरील नऊ नंबरच्या शाळेची दुरवस्था झाली आहे. अस्वच्छ वातावरणात आणि रस्त्याची गैरसोय असलेल्या ठिकाणी शाळा भरत आहे. पावसाच्या पाण्याने झालेल्या चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. वर्गात पावसाचे घाणेरडे पाणी, तुटलेली स्वच्छतागृहाची दारे, पावसामुळे भिंतीना ओलावा, अशा अनेक समस्यांचा सामना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करण्याची नामुष्कीची आली होती. शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू असल्याने दगडाचे आणि मातीचे ढिगारे शाळेच्या आवारात पडून आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात शाळेला उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर वास्तविक शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. चिखलातून वाट काढत जूनमध्ये शाळेत येण्याची वेळ आली होती. या संदर्भात गुरुवारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून अभियंत्याकडून शाळेची पाहणी करण्यात आली. पालिकेच्याच १२ नंबर शाळेतही विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा अनेक गैरसोई भेडसावत आहेत. त्या दूर करण्याची मागणी शाळेतर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही!
शाळेच्या दुरवस्थेबाबत वृत्त समजताच शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी जयश्री धायगुडे यांनी शाळेला भेट देत दुरवस्थेची पाहणी केली. शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत जुन्या इमारतीची नगरपालिकेच्या बांधकाम खात्यामार्फत दुरुस्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, असे निवेदन मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्याचे धायगुडे यांनी सांगितले.
तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती
पावसाळ्यात शाळेला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुविधा देण्यात येतील. शिवगंगानगरमध्ये शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे बांधकामही येत्या काही महिन्यांत पूर्ण केले जाईल, अशी माहिती नगरपालिकेचे अभियंता राजेश तडवी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.