समाजमाध्यमांवरील मैत्री पडली ज्येष्ठाला महागात
महिलेने उकळले ७३ लाख ७२ हजार रुपये
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : समाजमाध्यमांवरील एका ॲपवरून अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे नवीन पनवेलमधील ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. महिलेने ज्येष्ठ नागरिकासोबत प्रेमाचे नाटक करून भावनिक जवळीक साधली. त्यांना गोल्ड ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून तब्बल ७३ लाख ७२ हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नवीन पनवेलमध्ये कुटुंबासह राहणारे ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मार्च २०२४ मध्ये आपल्या मोबाईलमध्ये बम्बल नावाचा डेटिंग ॲप पाहत होते. त्या वेळी झिया नावाच्या महिलेसोबत त्यांची ओळख झाली. झियाने ज्येष्ठ नागरिकासोबत व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे तसेच व्हॉट्सॲपवर कॉल करून मैत्री केली. त्यांच्याशी भावनिक जवळीक साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर झियाने ज्येष्ठ नागरिकाला गोल्ड ट्रेडिंगची माहिती देत गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. ज्येष्ठ नागरिकाने २५ हजार रुपये भरल्यानंतर त्यांना ३,५६० रुपये नफा झाला. त्यामुळे त्यांनी मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. त्यानंतर झियाने ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये पैसे गुंतवणुकीतून जो फायदा होईल, त्यामधून तिच्यासोबत भागीदारीत सौंदर्यप्रसाधन निर्मिती कंपनी स्थापन करण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने ट्रेडिंग फ्लॅटफॉर्ममध्ये तब्बल ५८ लाख रुपये गुंतवले. या वेळी त्यांना दोन कोटींचा नफा झाल्याचे भासवण्यात आले. ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, कर स्वरूपात ४४ लाख ४० हजार रुपये भरण्यास सांगितले. इतकी रक्कम नसल्याचे ज्येष्ठ नागरिकाने सांगितल्यानंतर झियाने त्यांना एक कोटीसाठी २२ लाख रुपये कर भरावे लागेल, असे सांगितले. तसेच त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या वतीने आठ लाख रुपये कर ट्रेडिंग फ्लॅटफॉर्ममध्ये भरल्याचे झियाने ॲपवर दाखविले. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने आणखी १४ लाख २० हजार रुपये भरले. त्यानंतर त्यांनी नफ्यातील एक कोटीच्या रकमेची मागणी केली असता, झियाने ट्रेडिंग फ्लॅटफॉर्मची साईट बदल्याचे तसेच त्याचे नियम बदलल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना दोन कोटींच्या नफ्यासाठी त्यांना राहिलेले २२ लाख २० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
....................
तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
नवी मुंबई (वार्ताहर) : लग्नाच्या भूलथापा देऊन २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एकास एपीएमसी पोलिसांनी अटक केली. ओमप्रकाश राजेंद्रकुमार मिश्रा (२७) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ओमप्रकाश मिश्रा हा उलवेत राहत असून पीडित तरुणी गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये राहण्यास आहे. वर्षभरापूर्वी त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर प्रेम जुळले. गत मार्चमध्ये दोघे वाशी रेल्वेस्थानकात भेटले होते. या वेळी मिश्राने तरुणीला लग्नाच्या भूलथापा देऊन पाम बीच मार्गावरील एका लॉजमध्ये नेले. त्यानंतरही वेगवेगळ्या लॉजमध्ये नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
मिश्राने तरुणीसोबत लग्न करण्याची आपल्या कुटुंबीयांकडे इच्छा व्यक्त केली होती; मात्र त्यांनी लग्न करण्यास विरोध केला. त्यानंतर मिश्राने तरुणीला टाळण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या तरुणीने आठवडापूर्वी फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातून पीडित तरुणी बचावल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला.
तरुणीने तक्रारीवरून ओमप्रकाश मिश्रावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो एपीएमसी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर पोलिसांनी मिश्राला अटक केली असून न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याचे माहिती सहाय्यक निरीक्षक दयानंद जाधव यांनी सांगितले.