श्रीवर्धन, ता. ८ (वार्ताहर) ः पर्यटन क्षेत्र म्हणून श्रीवर्धन तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे. पर्यटन क्षेत्रात ‘ब’ दर्जा प्राप्त झालेल्या श्रीवर्धन येथे समुद्रकिनाऱ्यावरील सुशोभीकरण, मूळगाव कोळीवाडा येथे होणारा ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा, जीवना बंदर येथे होत असलेली अत्याधुनिक जेट्टी तसेच तारांगणमुळे पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे; मात्र अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीवर तोडगा निघावा, याकरिता गावात येण्या-जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची जन्मभूमी, प्राचीन मंदिरे, विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक श्रीवर्धनमध्ये येतात. पर्यटकांची संख्या वाढल्याने वर्दळीसाठी रस्ते अरुंद पडू लागले आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेची स्थापना ब्रिटिश राजवटीत १८८४ मध्ये झाली, तेव्हापासून ज्या स्थितीत रस्ते आहेत, आजही ती बदललेली नाही. श्रीवर्धन नगर परिषद इमारत, वाणीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान महावीर मार्ग, दादर पूल, जुने बसस्थानक व टिळक रस्ता हे कायम वर्दळीचे आणि वाहतूक कोंडीचे रस्ते म्हणून ओळखले जातात.
श्रीवर्धन येथील बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुने बसस्थानक व टिळक मार्गावर आहे. जेमतेम पाच ते सहा मीटर रुंदीचे अरुंद रस्ते, त्यात मुख्य बाजारपेठ असल्याने मालवाहतूक करणारी वाहने, खरेदीसाठी येणारे ग्राहक व पर्यटकांची वाहने यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकदा स्थानिक विरुद्ध पर्यटक किंवा मालवाहूचालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची होत असल्याचे दिसून येते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटीच्या सकाळी सात ते रात्री आठ या वेळेतील गावातील फेऱ्या बंद करण्यात आल्या. याचा फटका प्रवाशांना बसला आहे.
१९९७ मध्ये श्रीवर्धन शहरात बाह्यवळण मार्गासाठी विकास आराखड्याप्रमाणे एक किलोमीटर लांबीचा व १५ मीटर रुंदीच्या पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते. शहराचे प्रवेशद्वार श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे कमानीची मागील बाजू ते बाजारपेठेतील जुन्या बसस्थानकापर्यंत रस्त्याचे नियोजन होते. हा मार्ग झाला तर खासगी वाहने बाह्यवळण मार्गाने परस्पर गावात गेल्याने वाणीआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने बसस्थानक, टिळक रस्ता या दीड किलोमीटर मार्गावरील वाहतूक कोंडी टळली असती; मात्र राजकीय अनास्थेमुळे बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव रखडला आहे.
संघर्ष समितीचा रुंदीकरणाला विरोध
श्रीवर्धनमधील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण व्हावे, या दृष्टीने सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार १५ मीटर रुंद व तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण होणार होते; मात्र रस्त्यालगत असलेली ८० टक्के घरे तसेच श्रीवर्धन येथील मुख्य बाजारपेठ यामुळे उद्ध्वस्त होणार असल्याने रुंदीकरणाचा विषय बासनात गुंडाळला गेला. रुंदीकरणातील नुकसानग्रस्तांना वाढीव चटई क्षेत्र, पर्यायी जागा, जागेचा योग्य मोबदला दिला जाणार होता; मात्र बाधित घरमालकांनी संघर्ष समिती स्थापन करीत रुंदीकरणास विरोध दर्शवल्याने प्रस्ताव रखडला.
श्रीवर्धन शहराला पर्यायी रस्त्याची गरज आहे. या दृष्टीने नगर परिषदेकडून नियोजन सुरू आहे. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वारापासून करदमे बाग, जुने बसस्थानक असा बाह्यवळण रस्ता करण्याचा प्रस्ताव होता. भविष्यात याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टळेल.
- विराज लबडे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन
श्रीवर्धन ः अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.