करावे गावाजवळ कारचालकाचा मृत्यू
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : पाम बीच मार्गावरील टी. एस. चाणक्य चौकातून डावीकडे जाणाऱ्या होंडा सिटी कारला रस्ता दुभाजकातून निष्काळजीने युटर्न घेणाऱ्या कारचालकाने धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये झालेल्या अपघातात होंडा सिटीच्या कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ७) सकाळी सीवूड्स येथील करावे गावाजवळ घडली. एनआरआय पोलिसांनी याप्रकरणी इको कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
सचिन प्रदीप शहा (वय ४२) असे मृत कारचालकाचे नाव असून, तो सोमवारी सकाळी वाशी येथून पाम बीच मार्गे सीवूड्स येथे जात होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सचिन हा पाम बीच मार्गावरील टी. एस. चाणक्य चौकातून डाव्या बाजूला वळण घेऊन जात होता. याच वेळी इको कारचालकाने निष्काळजीने तेथील रस्ता दुभाजकातून यूटर्न घेताना सचिनच्या कारला धडक दिली. या अपघातात सचिन गंभीर जखमी झाल्याने सीवूड्स वाहतूक पोलिसांनी त्याला नेरूळमधील तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातप्रकरणी इको कारचालक तुकाराम वाघमारे याच्या विरोधात एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.