‘नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे, हे शिकले पाहिजे’
ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांचे प्रतिपादन; पालिकेच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा समारोप
खारघर, ता. १२ (बातमीदार) : नाटक म्हणजे केवळ नाटकात काम करणे नसते, तर त्यामधून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे हे शिकले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मुख्य कार्यवाह आणि ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी केले.
या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा पनवेलचे उपाध्यक्ष व माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने, रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक अनिल भगत, दर्शना भोईर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य राज आलोनी, पालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, नाट्य परिषदेच्या कार्यवाह शामराव पुंडे, अभिषेक पटवर्धन, स्मिता गांधी, गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पनवेल महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जून ते ७ जुलैदरम्यान अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप समारंभ गुरुवार, १० जुलै रोजी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. समारोपप्रसंगी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्व प्रशिक्षणार्थींनी एक गीत व चार लघुनाटिका सादर केल्या. बालगटातर्फे सादर करण्यात आलेल्या अदिम्बाच्या बेटावर, मानवाची उत्क्रांती तसेच वरिष्ठ ज्येष्ठ गटातर्फे टेन्शन टेन्शन व थांबा आणि विचार करा, या लघुनाटकांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले.
या वेळी डॉ. रूपाली माने, आयुक्त मंगेश चितळे, ज्येष्ठ नाट्यकर्मी संतोष बोंद्रे (अलिबाग), दिल्ली एनएसडीच्या ज्योती आर्य, महाराष्ट्र हास्यजत्रामधील धनंजय सरदेशपांडे, अभिनय प्रशिक्षक अशोक केंद्रे, अभिनेता संकेत खेडकर, रवि धुताडमल, डॉ. पाटोदकर आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजू पाटोदकर यांनी केले तर आभारप्रदर्शन शामराव पुंडे यांनी केले.