महाराष्ट्रभर स्वयंपुनर्विकासाचे धोरण राबविणार
आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ‘इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता. मुंबईत स्वयंपुनर्विकास यशस्वी झाला आहे. आता ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रभर स्वयंपुनर्विकासाचे हे धोरण राबविणार असल्याचे प्रतिपादन स्वयंपुनर्विकास समितीचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाण्यात केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनने ‘सहकारातून समृद्धीकडे’ याअंतर्गत हमखास पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयंपुनर्विकासासंबंधी इत्थंभूत माहिती देणारी कार्यशाळा शनिवारी (ता. १२) मो. ह. विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. त्या वेळी दरेकर बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे, वास्तुविशारद सचिन साळवी, मकरंद तोरसकर, अभियंता रवि शंकर शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी दरेकर म्हणाले, ‘स्वयंपुनर्विकासात तुम्हीच तुमचे मालक असता. जो काही फायदा होतो तो सभासदांचा असतो. यामध्ये गुणवत्ता आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता. मुंबईत स्वयंपुनर्विकास यशस्वी झाला.’ आता ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रभर स्वयंपुनर्विकासाचे हे धोरण राबविणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, ‘आमच्या समितीने मुंबई, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बैठका घेतल्या. स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांचे अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) एक महिन्यात करण्याच्या सूचना अभ्यास गटाच्या अहवालात केल्या आहेत. हा अहवाल सोमवारी शासनाला सादर केला जाणार आहे.’
जेव्हा एखादी चळवळ आंदोलन म्हणून उभी राहते, त्या वेळी त्याचे महत्त्व सरकार दरबारी येते आणि सरकार त्यावर उपाययोजना करते. स्वयंपुनर्विकासात जे यश मिळतेय त्याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. त्यामुळेच आज मुंबईत स्वयंपुनर्विकासातून १५ इमारती उभ्या राहिल्या असून, रहिवासी मोठ्या घरात राहायला गेल्या. ही स्वयंपुनर्विकासाची ताकद आज गती घेताना दिसत असून, स्वयंपुनर्विकासामुळे गृहनिर्माण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ आली आहे.
- प्रवीण दरेकर, अध्यक्ष, स्वयंपुनर्विकास समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.