वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी रुग्णांची परवड
दिशा समितीच्या बैठकीत आरोग्य विभागावर ताशेरे; जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः काही महिन्यांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालयाबाबत तक्रारी येत आहेत. अनेक केंद्रांचे निवासी वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी राहात नसल्याने रात्रीच्या वेळी रुग्णांची परवड होते. याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले दिल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १४) झाली. बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. त्याचप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
या वेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रवींद्र शेळके, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हाभरात शिबिरे घेण्याच्या सूचना मध्यंतरी करण्यात आल्या होत्या, मात्र या सूचनांचे पालन आरोग्य विभाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांकडून झाले नाही. त्यामुळे आजही अनेकांना सामान्य रुग्णालय अथवा शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागतात. आरोग्य विभागाचा दिव्यांगांप्रति असलेल्या असंवेदनशील कारभारावर या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
‘त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाका!
जिल्ह्यात प्रमुख महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे अनेक वर्षांपासून रखडली आहेत. याबाबत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त करून जे ठेकेदार रस्त्याची कामे करीत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकावे आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी. तसेच ज्या रस्त्यांच्या कामांसाठी नव्याने ठेकेदार नियुक्त केला आहे, त्यांना तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर
जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक ग्रामपंचायती, नगरपालिकांकडे कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे चार-पाच ग्रामपंचायती मिळून एका क्षेपणभूमीची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा परिषदेसह विविध कंपन्यांनी आपला सीएसआर निधी वापरून पुढाकार घ्यावा, अशी सूचना आमदार महेंद्र दळवी यांनी दिली. याला खासदार धैर्यशील पाटील यांनी दुजोरा देत अविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापराबाबत विचार करण्याच्या सूचना केल्या.
अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
अनेक ग्रामपंचायती, शिधावाटप केंद्राबाहेर सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे फलक लावण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक वेळा नोटीस पाठवून, पत्रव्यवहार करूनही विविध विभागांचे अधिकारी विशेषतः सिडको, नैना प्रकल्प, एमएमआरडीएसारख्या विभागांचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहातात, हे व्यवहार्य नाही. याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावूनही अधिकारीवर्ग गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे बैठकीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.