अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) ः अपघात, गर्भवती किंवा इतर गंभीर आजार झालेल्या रुग्णाला रुग्णालयात अथवा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरते. ही सेवा सुरू झाल्यापासून ११ वर्षांत रायगड जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार १४४ रुग्णांना जीवनदायी ठरली आहे.
सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घेऊन जाणे, अपघातग्रस्त, गर्भवती, विषबाधा, सर्पदंश, आगीच्या घटनांमधील जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी एका कॉलवर १०८ रुग्णवाहिका येते व आपली सेवा बजावत आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण चार एएलएस तसेच १९ बीएलएस अशा एकूण २३ रुग्णवाहिका सेवा देत आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये ६०५ गर्भवतींची प्रसूती झाली असून, ८३ रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे गरजेचे
अनेक वेळा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला मुंबई येथे हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला जातो, मात्र त्या ठिकाणी रुग्णवाहिका नसल्यास ती दुसऱ्या तालुक्यातून बोलावण्यात येते. यात खूप वेळ वाया जातो. यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना इतर ठिकाणी शोधाशोध करावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्णाला मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले असता अनेकदा तेथे वेळेवर उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे दाखल करून घेताना रुग्णाला ज्या स्ट्रेचरवर आणले आहे, त्याच स्ट्रेचरवर सर्व तपासणी करण्यात येते. यामुळे रुग्णवाहिका तेथेच ताटकळत थांबवावी लागते. अशा वेळी इतर रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेची गरज भासल्यास त्यांना सेवा मिळण्यास विलंब होतो.
रायगड जिल्ह्यात २३ रुग्णवाहिका आहेत. रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी अहोरात्र १०८ रुग्णवाहिका काम करीत आहे. काहीवेळा अंतर जास्त असल्याने अथवा इतर ठिकाणाहून रुग्णवाहिका येण्यास विलंब होतो. ही अडचण असली, तरी रुग्णाला दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असतो. रुग्णाचा जीव वाचविणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आम्ही आणखी रुग्णवाहिका मिळाव्यात यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच त्याही उपलब्ध होतील.
- जीवन काटकर, जिल्हा व्यवस्थापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.