विठ्ठलवाडी आगारात अस्वच्छता
संतोष दिवाडकर; सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १७ (बातमीदार) : शहरात सध्या साथीचे आजार बळावले असून, महापालिका प्रशासन डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे; मात्र दुसरीकडे विठ्ठलवाडी व कल्याण एसटी आगारात सध्या अस्वच्छता पसरल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगारातून प्रवास करणारे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे कल्याण एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात मागील दोन वर्षांपासून विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतरित झालेला आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास लांबच्या पल्ल्याच्या एसटी पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी स्थानकात असते. याच स्थानकाच्या मागील बाजूला कल्याण एसटी आगाराच्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर राडारोडा झालेला आहे. छोटी मोठी डबकी तयार होऊन त्यातही पाणी साचून राहते. चिंताजनक बाब म्हणजे याच भागात एसटी कर्मचाऱ्यांची निवासस्थानेदेखील आहेत. यावर उपाय म्हणून कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मार्ग काढला होता; तरीही काही प्रमाणात पाणी साचत असल्याचे दिसून येते.
एसटी स्थानकासमोरच मधोमध खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहते. चालकांच्या निदर्शनास न आल्याने हेच पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. त्यामुळे पावसाळा संपून डागडुजी होईपर्यंत कमीत कमी या खड्ड्यात भराव टाकावा, अशा सूचना प्रवासीवर्गाकडून केल्या जात आहेत.
विश्रामगृहांची दुरवस्था
विठ्ठलवाडी एसटी स्थानकात कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह आहे; मात्र या विश्रामगृहाची दुरवस्था झालेली असून भिंतींना जागोजागी तडे गेले आहेत. तसेच खिडक्यादेखील मोडकळीस आलेल्या आहेत. आतील बाजूला काही पंख्यांवर धुळीचे थर साचले आहेत. काही पंखे बंद अवस्थेत असल्याने कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यापासून अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांमुळे रात्रीची झोप मुश्किल झाल्याचे कर्मचारी सांगतात. ठाणे आगारात ज्याप्रमाणे सुसज्ज असे विश्रामगृह बनविले आहे, तसे आम्हाला लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. आगार नूतनीकरणाच्या मार्गावर आहे. त्यामुळे सुसज्ज विश्रामगृह उभे राहील, असा विश्वास आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी व्यक्त केला आहे.
पाण्याची टाकी जीर्ण
एसटी आगारात पाण्याची साठवणूक करणारी टाकी जीर्ण झाली आहे. तसेच तिची साफसफाईदेखील करण्यात आलेली नाही. या टाकीवर अक्षरशः भलेमोठे पिंपळ वृक्ष बहरले असून, त्याची पाळेमुळे टाकीत उतरली आहेत. याच टाकीतील पाण्याचा संपूर्ण आगारात जलवाहिनीद्वारे पुरवठा होतो. हेच पाणी आगारातील कर्मचारी पिण्यासाठी वापरतात. ही बाब लक्षात घेत काही महिन्यांपूर्वीच स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवले आहे. असे असले तरी पाणीसाठा करणाऱ्या टाकीची डागडुजी व सफाई वेळच्या वेळी करणे अधिक गरजेचे आहे. यासाठी आगार व्यवस्थापकांनी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत लवकरच पर्यायी व्यवस्था करून जीर्ण टाकी बंद केली जाईल, असे सांगितले; मात्र यासाठी ठाणे विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.
टायरमुळे डासांची उत्पत्ती
विठ्ठलवाडी एसटी आगारातच कल्याण एसटी आगाराची कार्यशाळा आहे. गाड्यांचे बदलले अथवा निकामी टायरचा एका जागेवर ढीग लावलेला आहे. त्या टायरमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. याच साचलेल्या पाण्यातून डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. पाहणीसाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी हे टायर हटविण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना केलेल्या आहेत. त्यानुसार काही टायर हटविले असून उर्वरित टायर लवकरच हटवू, असे सांगण्यात आले.
प्रवाशांची रेलचेल
पुढील महिन्यात गणेशोत्सव असून आगारातून शेकडोंच्या संख्येने एसटी गाड्या कोकण व अन्य ठिकाणी मार्गस्थ होतात. हजारो प्रवाशांची रेलचेल विठ्ठलवाडी एसटी आगारात एसटी पकडण्यासाठी होते. त्यापूर्वीच सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने तसेच आगाराने प्रयत्न करायला हवेत, अशा सूचना एसटी प्रवासी संघाकडून केल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.