रजनीकांत साळवी ः सकाळ वृत्तसेवा
प्रभादेवी, ता. २० (बातमीदार): पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दादर वाहतूक विभागाने मुंबईत पहिल्यांदाच पार्किंग करा, पण विहित वेळेत अन्यथा दंडही भरावा लागेल, अशा सूचना फलक लावला आहे. शिवाय वाहने पार्किंग कुठे आणि कुठल्या वेळेत करायची याची वेळ दाखवणारी सूचना फलकावर असल्याने वाहतूक कोंडीला आळा बसेल, असा दावा केला जात आहे.
दादर वाहतूक विभागाच्या वतीने पोलिस सह आयुक्त (वाहतूक)- अनिल कुंभारे, अप्पर पोलिस आयुक्त (वाहतूक) प्रियांका नारनवरे, पोलिस उपायुक्त वाहतूक (मुख्यालय व मध्य) दीपाली धाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पार्क मैदानाबाहेरील रस्त्यावर पार्किंग फलकाचे अनावरण शनिवारी करण्यात आले. या वेळी दादर वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाबाहेरील पार्किंग व्यवस्था सम/विषम या पद्धतीची होती, पण आता दादर वाहतूक विभागाने शिवाजी पार्कलगत सकाळी ५:३० ते ११:३० दरम्यान वाहने उभी करण्यासाठीची जागा उपलब्ध केली आहे. तसेच कायमस्वरूपी पार्किंग करू नये म्हणून रात्री ११:३० ते सकाळी ५:३० वाजेपर्यंत रहिवासी बाजूला पार्किंग दिले आहे. त्यामुळे कोणीही कायमस्वरूपी वाहन पार्किंग करू शकणार नाही, असे प्रभारी पोलिस निरीक्षक कन्हैयालाल शिंदे यांनी सांगितले.
--------------------------------------
शिवाजी पार्क मैदानाबाहेर दोन्ही बाजूने पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत होती, मात्र दादर वाहतूक विभागाने राबविलेल्या संकल्पनेनुसार पार्किंगची समस्या मिटेल.
- पंकज म्हात्रे, स्थानिक