मोठ्या मनाचा राजा
-----------
-माणुसकी, समाजसेवा व विकासाचा ध्यास जपणारे राजेश मपारा
-समाजकारण, राजकारण व व्यवसायात उत्तुंग झेप
--------------
‘प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी स्वतः!’ - ही संघ संस्कारात मिळालेली शिकवण मनात बाळगून आणि भगव्या ध्वजाप्रति निष्ठा जपणारे राजेश नीता शरद मपारा हे नाव महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक बनले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, यशस्वी उद्योजक, समाजप्रेमी आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आणि जीवनसंघर्षाचा आढावा...
------------
राजेश नीता शरद मपारा यांच्या कारकीर्दीचा आलेख थक्क करणारा आहे. त्यांना घरातूनच व्यवसायाचे बाळकडू मिळाले. घरची सुस्थिती असतानादेखील समाजाप्रति आपण काही देणं लागतोय, लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हे आपले महत्त्वाचे कामच आहे, अशी भावना घेऊन राजेश मपारा यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आपल्या सामाजिक आयुष्याला सुरुवात केली. पालीतील ग. बा. वडेर हायस्कूल येथे शालेय शिक्षण व शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण झाले. नेतृत्व गुण हा पहिल्यापासूनच त्यांच्यामध्ये असल्यामुळे महाविद्यालयात असताना ते महाविद्यालयातील जीएसची निवड ही नेहमी त्यांच्याच नेतृत्वाखाली चाणक्षपणे केलेली दिसली. वडिलांचा व्यवसाय सांभाळताना त्यांनी तो कशाप्रकारे आणखी वाढेल, या दृष्टीने प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी राजकारणामध्येही झेप घेतली. राजकारणातही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्व व प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर अनेक पदे भूषवली. पाली गावचे सरपंच ते जिल्हा उपाध्यक्ष - भारतीय जनता पक्ष (दक्षिण रायगड) व भाजप महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य आदी पदे भूषवली व भूषवत आहेत. राजकारणाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय पदे भूषवली आहेत. ते डॉ. मो. वि. पुरोहित या पालीतील १०० वर्षे जुने वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. पाली व्यापारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, तसेच पालीच्या हटाळेश्वर मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आहेत. सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष होते.
समाजाचे देणे
राजेश मपारा यांच्या मनात समाजसेवेची भावना लहानपणापासूनच रुजली. घरची सुस्थिती असूनही आपण या समाजाला काहीतरी देणे लागतो या विचाराने त्यांनी महाविद्यालयीन काळापासून सामाजिक कार्याला सुरुवात केली. राजकारणामध्ये सक्रिय होण्यामागे हाच दृष्टिकोन त्यांचा होता. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर मदत करणे, गरजू लोकांसाठी अडचणीच्या वेळी उभे राहणे यातूनच मपारा सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत.
उद्योग व व्यवसायातील गरुडझेप
मपारा यांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर उद्योग व व्यवसायातही मोठे यश मिळवले आहे. सुधागड तालुक्यातील झाप येथे शुभारंभ मंगल कार्यालयासारख्या भव्य प्रकल्पासह त्यांनी हॉटेल व्यवसाय, भात गिरणी आणि इतर उद्योगांमध्ये आपली छाप पाडली. मात्र व्यावसायिक यशाच्या बरोबरीने सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देताना ते नेहमीच अग्रगण्य राहिले आहेत. एवढ्या मोठ्या व्यवसाय उद्योगाचा डोलारा सांभाळतानादेखील ते कधीही चिंतेत किंवा त्रासलेले दिसत नाहीत. विशेष म्हणजे ते स्वतः सामाजिक व धार्मिक जीवनात गुंतलेले दिसतात. सोबतच राजकारणातही ते सक्रिय असतात.
राजकीय क्षितिज
पाली गावचे सरपंचपदापासून ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण रायगड) आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य या पदापर्यंत राजेश मपारा यांनी मजल मारली आहे. आपल्या कार्यकुशलतेने पक्षात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. प्रशासनावरची त्यांची पकड आणि जनसमस्यांवरची संवेदनशीलता यामुळे ते नेहमीच जनतेचे आवडते नेते बनले आहेत.
कला, क्रीडा व आरोग्यासाठी पुढाकार
आपल्या व्यग्र जीवनातदेखील राजेश मपारा हे कला, क्रीडा, सांस्कृतिक आरोग्य व धार्मिक उप्रकमात पुढाकार घेतात. सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात क्रीडा स्पर्धा असो की सांस्कृतिक कार्यक्रम असो ते या ठिकाणी आवर्जून भेट देतात. त्याचबरोबर या कार्यक्रमांना भरभरून बक्षिसे देतात. अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजनदेखील करतात. ते स्वतः अनेक उदयोन्मुख खेळाडू व कलाकारांना विविध प्रकारची मदत करतात.
आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठीदेखील ते नेहमी धडपडत असतात. कोरोना काळात वाड्यापाड्यांवर जीवनावश्यक वस्तू व धान्यवाटप केले. तसेच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड सेंटर या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू दिल्या. आर्थिक मदतदेखील केली आहे. शेतकरी बांधवांसाठी खते वाटपदेखील केले आहे.
अध्यात्माची ओढ
पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत ज्या दिवशी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्याच दिवशी राजेश मपारा स्वतः मुख्य विश्वस्त असलेल्या हटाळेश्वर मंदिर परिसरात रामपंचयतनची स्थापना करून हा परिसर रंगरूप बदलून भक्तिमय करण्याची उत्तम कामगिरी त्यांनी केली. धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमात तर ते सर्वतोपरी सहकार्य करतात. अगदी गाव खेड्यातील धार्मिक कार्यक्रम, पूजा भजन-कीर्तन, भंडारा, उत्सव यांना सढळ हस्ते देणगी देतात तसेच धार्मिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थितीदेखील दर्शवतात. इतर धर्मीयांच्या कार्यक्रमांनादेखील ते हजर राहतात. बंधुभाव व सलोखा राहावा यासाठी इतर धर्मीयांच्या कार्यक्रमालादेखील सहकार्य करतात. त्यामुळे सर्व धर्मीयांच्या मनात राजेश मपारा यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकीची भावना आहे.
इतिहासाची साक्ष देणारी अशी भव्य दिव्य हटाळेश्वर मंदिराची वास्तू बनविणे हे त्यांचे स्वप्न आहे. उत्तरोत्तर उत्तम धार्मिक गोष्टी करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
शिक्षणासाठी मदतीचा हात
शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रमालादेखील राजेश मपारा यांच्याकडून नेहमीच मदतीचा हात मिळतो. हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी मदत केली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य त्याबरोबरच छत्री बूट आदी साहित्याचे वाटपदेखील ते नित्य नियमाने करतात. ते दहावी व बारावीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करतात.
स्पर्धा परीक्षेचे दालन खुले
राजेश मपारा पालीतील शंभर वर्ष जुन्या असलेल्या डॉ. मो. वि. पुरोहित वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे सुसज्ज दालन उभारण्यात आले आहे. ज्यामुळे याठिकाणी अभ्यास करून तालुक्यातील होतकरू, गरीब व आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार होत आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके येथे विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत आहेत.
सढळ हस्ते मदत : निस्वार्थ सेवाभाव
सहकार्य व मदत ही जात, पंथ, पक्षापेक्षा मोठी असते, हा विचार मनात बाळगून राजेश मपारा कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला मदतीसाठी नकार देत नाहीत. आरोग्य, शिक्षण, आर्थिक संकट, अडचणी यांसाठी ते नेहमीच आधारस्तंभ ठरतात. नुकतेच राजेश मपारा यांनी त्यांच्या आयुष्यातील ३८वे रक्तदान पूर्ण केले.
कोणालाही वैयक्तिक मदत लागल्यास राजेश मपारा ताबडतोब शक्य ती मदत करतात. यावेळी ते कोणताही भेदाभेद करत नाहीत. ती व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही पक्षाशी किंवा संघटनेशी बांधील असो ते त्या व्यक्तीला किंवा संस्थेला निस्वार्थीपणे सहकार्य करतात. त्यामुळेच अगदी आरोग्य, शैक्षणिक किंवा खासगी जीवनातदेखील कोणाला पैसे किंवा इतर स्वरूपाची मदत लागल्यास व अडचणीची परिस्थिती आल्यास ते निर्धोकपणे राजेश मपारा यांच्याकडे मदतीसाठी जातात आणि मोकळ्या हाती परतत नाहीत.
विकासाची दूरदृष्टी : जनहिताचे ध्येय
ग्रामीण ते शहरी विकास, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे.
विकासाचा ध्यास व दूरदृष्टी हे महत्त्वाचे गुण त्यांच्याकडे आहेत. त्यामुळेच गाव खेड्यापासून शहराचा विकास कसा साधता येईल, त्याबरोबरच नागरी व ग्रामीण सेवा सुविधा पुरवण्यासाठी काय करता येईल, याबाबत राजेश मपारा नेहमी प्रयत्नशील असतात. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कारकीर्दीत लोकाभिमुख कामे मार्गी लावली आहेत. तसेच विविध विकासकामेदेखील करण्याकडे त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे व समाजोपयोगी उपक्रम मार्गी लागत आहेत.
कुटुंबीयांची भक्कम साथ
व्यावसायिक, सामाजिक व राजकीय जीवनात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडत असताना, वेगवेगळ्या चढउतारामध्ये व कठीण परिस्थितीमध्ये राजेश मपारा यांना नेहमीच त्यांच्या कुटुंबीयांची भरभक्कम साथ लाभते. त्यांचे वडील शरद मपारा व आई नीता मपारा हे राजेश मपारा यांच्यासाठी नेहमीच एक प्रेरणास्रोत होते आणि आहेत.
त्यांच्या चारही बहिणी आणि भाऊजी हे आई-वडिलांइतकेच मार्गदर्शक व सुरक्षा कवच म्हणून त्यांच्या नेहमी सोबत असतात.
त्याच जोडीला पत्नी वैशाली यांची खंबीर साथ राजेश मपारा यांना लाभली आहे. कोणत्याही कठीण व अवघड परिस्थितीमध्ये वैशाली मपारा या राजेश मपारा यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहतात. वेळप्रसंगी दोन पावले पुढे जाऊन त्यांची ढालही बनतात. वैशाली मपारा या राजेश मपारा यांना त्यांच्या व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र असे सहकार्यदेखील करतात.
त्या जोडीलाच त्यांची मुलगी ऐश्वर्या व मुलगा उत्कर्ष यांचे प्रेम राजेश मपारा यांना सातत्यपूर्ण काम करण्याची ऊर्जा देते. आपल्या वडिलांच्या प्रत्येक योग्य गोष्टीत ते ठामपणे सोबत असतात.
प्रशासनावर पकड
उच्चशिक्षित तसेच महत्त्वाची पदे भूषवल्यामुळे मपारा यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे. आपल्या राजकीय व सामाजिक अनुभवाच्या जोरावर राजेश मपारा हे प्रशासकीय बाबींमध्ये नेहमी अग्रेसर ठरतात. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न व अडचणी सोडवण्यास नेहमीच उपयोग होतो. तसेच सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी कधीही प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. याशिवाय सामान्य नागरिक व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधला.
कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे जिव्हाळ्याचे संबंध
राजेश मपारा यांनी कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचे नाते जोपासले आहे. पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या समर्पित वृत्तीमुळेच कार्यकर्ते त्यांना केवळ नेते नव्हे तर मार्गदर्शक मानतात. जिल्ह्यात प्रथम राष्ट्र, मग पक्ष व शेवटी स्वतः हा मूलमंत्र रुजला गेलाच पाहिजे ही त्यांची विचारधारा आहे आणि संघटनेवर व संघटना वाढीवर या विचारधारेचा अधिक भर असतो.
मैत्रीच्या जगतातील राजा माणूस
मैत्रीच्या जगतातील राजा माणूस अशीही राजेश मपारा यांची ओळख सांगता येईल. कोणीही कसेही वागले, तरी एकदा मैत्री केली, नाते जोडले की मान अपमानाचा विचार न करता ते शेवटपर्यंत निभावणे आणि टोकाला जाऊन जपणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांना असंख्य मित्र आजतागायत जोडले गेलेले आहेत.
पाली व्यापारी पतसंस्थेला उर्जितावस्था
पाली व्यापारी पतसंस्था आर्थिक अडचणीत असताना तिचे अध्यक्षपद अवघ्या वयाच्या २६व्या वर्षी स्वीकारण्याचे धाडस केले आणि एवढेच नाही तर संस्थेच्या हितासाठी प्रसंगी कटू वाटणारे निर्णयही धडाडीने घेऊन पतसंस्थेला उर्जितावस्था प्राप्त करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ही संस्था आजही उत्तम परिस्थितीत असून, तिच्या संचालकपदी ते तेवढ्याच उत्साहाने काम करत आहेत.
एक अजोड व्यक्तिमत्त्व
राजेश मपारा हे केवळ एक नेते, उद्योजक किंवा समाजसेवक नाहीत, तर ते एक प्रेरणादायी, जीवनमूल्य जपणारे, सामाजिक बांधिलकी जोपसणारे आणि माणुसकी हाच खरा धर्म असे मानणारे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांनी आपल्या निस्वार्थ भावनेने समाजात एक अमिट छाप सोडली आहे. माणुसकी हाच खरा धर्म, सेवा हेच खरे राजकारण हे तत्त्व जपणारे राजेश मपारा यांना त्यांच्या वाढदिवसाच्या नातेवाईक, असंख्य हितचिंतक, मित्रपरिवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्याकडून शुभेच्छा देताना एवढच म्हणेन,
नवे क्षितिज, नवी पहाट,
फुलावी आपल्या आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य सदैव आपल्या चेहऱ्यावर राहो,
हजारो सूर्य आपल्या पाठीशी तळपत राहो,
आपले आयुष्य सुख समृद्ध व ऐश्वर्य संपन्न होवो,
या सदिच्छा...
वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा!
-अमित गवळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.