कळवा रुग्णालयात रुग्णांचा ताण वाढला
बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या थेट दोन हजारांवर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. अशातच ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज दीड हजार ते एक हजार ७०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात हजेरी लावत होते; मात्र पावसाळा सुरू झाल्याने बाह्यरुग्ण विभागावर विविध आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे दररोज दोन हजार २०० वर रुग्णसंख्या पोहोचली आहे, त्यामुळे कळवा रुग्णालयावर ताण वाढत आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील व आजूबाजूच्या शहरातील गोरगरीब रुग्णांचे हक्काचे रुग्णालय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाहिले जात आहे. अशातच पावसाळ्यात पाणी साचल्याने, तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे साथीचे आजार बळावतात. या आजारांशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. असे असले तरी दुसरीकडे या रुग्णालयात यापूर्वी येथील बाह्यरुग्ण विभागात दीड हजार ते एक हजार ७००च्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून येथील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजार ते अडीच हजारपर्यंत गेल्याचे दिसत आहे. यात थंडीताप, डोळे येणे, कानदुखी, अतिसार आदी आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर अतिदक्षता (अपघात विभागात) हीच परिस्थिती आहे. मंगळवारी (ता. २२) येथे ३९८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर रोजच्या रोज नव्याने रुग्ण विविध आजारांवर उपचारासाठी दाखल होत आहेत. या रुग्णालयातील खाटांची क्षमता ५००च्या आसपास आहे. २२ जुलैला ४७७ रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पावसाळा असल्याने आता साथरोगांच्या आजारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
साथरोगांचा सामना
कळवा रुग्णालयात सध्या ओपीडीवर येणाऱ्या २,२०० हून अधिक रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला, अतिसार, डोळे येणे आदी रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. ७० ते ८० टक्के रुग्ण हे गर्दी, तापाचे आणि व्हायरल आजाराचे दिसून आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थादेखील आता साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून पुरेसा औषधसाठादेखील उपलब्ध करून घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.